कल्याण: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौक सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आणि चौक आहे. या चौकामध्ये शासनाने उड्डाण पूल मंजूर केला आहे. या पुलाला अडथळा ठरणारी अतिक्रमणे राजकीय हेव्यादाव्यामुळे हटविली जात असल्याने या पुलाच्या उभारणीत अडथळा आला आहे. राजकीय कारणांमुळे महत्वपूर्ण उड्डाण पूल रखडल्यामुळे या पूल प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय वास्तुविशारद संदीप पाटील यांनी घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पलावा चौकाच्या दुतर्फा नागरी वस्ती वाढली आहे. पलावा नागरी वसाहतीमधील बहुतांश नोकरदार, व्यावसायिक वर्ग खासगी वाहनाने कामाच्या ठिकाणी जातो. ही वाहने पलावा चौकात रस्त्याच्या दोन्ही बाजुने मुख्य रस्त्यावर येताना, जाताना मुख्य रस्त्यावरील वाहनांना नेहमीच अडथळा येतो. पलावा चौक मागील चार ते पाच वर्षापासून वाहतूक विभागाने विविध प्रकारचे नियोजन करुनही वाहन कोंडीत अडकतो.

हेही वाचा >>> पलावा चौक येथे महिला रिक्षेतून पडून गंभीर जखमी, रिक्षा चालकाचा निष्काळजीपणा

या वाहन कोंडीचा विचार करुन शासनाने पलावा चौकात पाच वर्षापूर्वी उड्डाण पूल मंजूर केला आहे. मागील चार वर्षापासून या चौकात पूल उभारणीचे काम सुरू आहे. या रस्त्यालगत एका राजकीय पदाधिकाऱ्याचे हाॅटेल, एका दुकान अडथळा ठरत आहे. ही दोन्ही अतिक्रमणे हटविण्या शिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराला याठिकाणी काम करणे शक्य नाही. पुलाचे खांब दोन वर्षापूर्वी उभारण्यात आले आहेत. परंतु, राजकीय दबावामुळे बाजुच्या अतिक्रमित दुकानांवर पालिका किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेला कारवाई करता येत नाही. मनसेचे स्थानिक आ. प्रमोद पाटील यांनी चार वर्षापासून पलावा चौकातील वाहन कोंडी, यामुळे प्रवाशांचे विशेषता महिला प्रवाशांचे हाल विचारात घेऊन पलावा चौकात तातडीने् पूल उभारणीची कामे सुरू करावीत. या भागातील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी शासनाकडे सुरू ठेवली आहे.

हेही वाचा >>> खड्ड्यांना जबाबदार ठेकेदार-अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांची मागणी

आ. पाटील यांच्याशी राजकीय वितुष्ट असलेला या भागातील एक आक्रमक लोकप्रतिनिधी पलावा चौकातील अतिक्रमणे हटणार नाहीत, आ. पाटील यांची शासनस्तरावरुन पुलासंदर्भातची एकही मागणी मान्य होणार नाही याची विशेष काळजी घेत आहे. या राजकीय वितुष्टाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसत आहे. राजकारण खेळा पण उड्डाण पुलासाठी नको, प्रवाशांच्या जीवाशी नको, असे आवाहन आ. प्रमोद पाटील यांनी ट्विट, निवेदनाव्दारे शासनाकडे केले आहे. या पुलाच्या बाजुच्या वस्तीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद उर्फ राजू पाटील राहतात. या दोन्ही लोकप्रतिनिधींसह अभिनेते, कलाकार, लेखकांना नेहमीच शिळफाटा कोंडीचा फटका बसत आहे. या कोंडीमुळे डोंबिवली, कल्याणमध्ये मुंबई, पुण्यातील कोणी वरिष्ठ कार्यक्रमांना येण्यास तयार होत नाही.

राजकीय वादामुळे पलावा चौकातील उड्डाण पूल रखडला आहे. याची माहिती मिळाल्याने वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ दिवसात पुलाचे काम सुरू करावे, अन्यथा न्यायालयीन आदेशाला सामोरे जा, असे पत्र पाटील यांनी एमएसआरडीसी, या कामाच्या ठेकेदारांना पाठविले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public interest litigation in high court for stalled bridge at palawa chowk ysh