ठाणे महापालिकेच्या सत्तेत जे काही उपलब्ध होईल ते आम्हालाच हवे अशा आविर्भावात वावरणाऱ्या नगरसेवकांनी आता महापालिका परिवहन उपक्रमाच्या सदस्यपदावर आपला हक्क सांगितला आहे. टीएमटीच्या समितीवर वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ, जाणकारांची नियुक्ती केली जावी, असे संकेत आहेत. मात्र, राजकीय सोयीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांची या पदावर नियुक्ती करण्याकडे आतापर्यंत सर्वच पक्षांचा कल राहिला आहे. असे असताना काही नगरसेवक आणि स्वीकृत सदस्यांनी टीएमटीच्या सदस्यपदासाठी आग्रह धरल्याने महापालिकेने यासंबंधीचे धोरण आखण्याचा नवा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. टीएमटीच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांच्या निविदा वर्षभरात मंजूर होत असतात. त्यामुळे स्थायी समिती नाही तर किमान परिवहन समिती तरी पदरात पडावी, यासाठी नगरसेवकांचा एक मोठा गट मोर्चेबांधणी करू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये यंदाही नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेतील विशेष समित्या आणि स्वीकृत नगरसेवकपदांच्या निवडीपाठोपाठ आता गेल्या वर्षभरापासून रखडलेली ठाणे परिवहन समितीवर सदस्यांची निवड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या सदस्यपदासाठी नगरसेवक आणि स्वीकृत सदस्य आग्रह धरू लागल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. या निवडीमुळे रोष ओढवण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने यासंबंधीचा निर्णय लोकप्रतिनिधींवर सोपविला असून यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर ठेवला आहे. या प्रस्तावावर लोकप्रतिनिधीच निर्णय घेणार असल्याने परिवहन समितीवर नगरसेवकांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. परंतु या निर्णयामुळे राजकीय पक्षातील अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लोकप्रतिनिधींचा टीएमटीवर डोळा
ठाणे महापालिकेच्या सत्तेत जे काही उपलब्ध होईल ते आम्हालाच हवे अशा आविर्भावात वावरणाऱ्या नगरसेवकांनी आता महापालिका परिवहन उपक्रमाच्या सदस्यपदावर आपला हक्क सांगितला आहे.
First published on: 16-04-2015 at 12:07 IST
TOPICSलोकप्रतिनिधी
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public representatives eye on tmt