सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेला भूखंड गिळंकृत होत असल्याचे प्रकार एकीकडे वाढीस लागले असताना आता कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या जागांवरही बेकायदा इमले उभे करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण पूर्व भागातील सूचकनाका भागात एका विकासकाने सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता त्याने हे शौचालय जमीनदोस्त केले. या भागातील रहिवाशांकडून या स्वच्छतागृहाचा नियमित वापर केला जात असताना महापालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय हे स्वच्छतागृह कसे पाडले जाऊ शकते, असा सवाल येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.
सूचकनाका येथील नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या प्रभागात हे सार्वजनिक शौचालय आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे वजनदार नगरसेवक म्हणून ख्याती असलेल्या नगरसेवक शेट्टी यांच्या प्रभागात येऊन विकासकाने हे सार्वजनिक शौचालय तोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी कोणत्याही मुद्दय़ावर सभागृह डोक्यावर घेणारे शेट्टी या प्रकरणी आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारे शौचालय पाडण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता विकासक सुरेश व सूरज वाधवा यांनी हे सार्वजनिक शौचालय पाडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतागृह पाडल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे या विकासकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जौरस यांनी स्पष्ट केले. नगरसेवक शेट्टी यांनीही या विकासकांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रहिवाशांच्या तक्रारी
तब्बल २० वर्षांपूर्वी महापालिकेने लाखो रुपयांचा खर्च करून हे सार्वजनिक शौचालय बांधले होते. सूचकनाका परिसरातील झोपडपट्टी, गाळेधारक या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करतात. या भागातील एका विकासकाने महापालिकेस कोणत्याही स्वरूपाची परवानगी न देता हे सार्वजनिक शौचालय पाडल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. नगरसेवक मल्ले
श शेट्टी तसेच महापालिका अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी या भागातील रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत.