सार्वजनिक सुविधांसाठी आरक्षित असलेला भूखंड गिळंकृत होत असल्याचे प्रकार एकीकडे वाढीस लागले असताना आता कल्याण-डोंबिवलीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या जागांवरही बेकायदा इमले उभे करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण पूर्व भागातील सूचकनाका भागात एका विकासकाने सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त केले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता त्याने हे शौचालय जमीनदोस्त केले. या भागातील रहिवाशांकडून या स्वच्छतागृहाचा नियमित वापर केला जात असताना महापालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय हे स्वच्छतागृह कसे पाडले जाऊ शकते, असा सवाल येथील रहिवासी उपस्थित करत आहेत.
सूचकनाका येथील नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या प्रभागात हे सार्वजनिक शौचालय आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे वजनदार नगरसेवक म्हणून ख्याती असलेल्या नगरसेवक शेट्टी यांच्या प्रभागात येऊन विकासकाने हे सार्वजनिक शौचालय तोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एरवी कोणत्याही मुद्दय़ावर सभागृह डोक्यावर घेणारे शेट्टी या प्रकरणी आता कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी कार्यकारी अभियंता रवींद्र जौरस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारे शौचालय पाडण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता विकासक सुरेश व सूरज वाधवा यांनी हे सार्वजनिक शौचालय पाडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतागृह पाडल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे या विकासकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही जौरस यांनी स्पष्ट केले. नगरसेवक शेट्टी यांनीही या विकासकांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा