किन्नरी जाधव

गृहसंकुले, कंपन्यांना प्रवासीसेवा पुरवण्यासाठी वर्षभरात ७६० बसगाडय़ांची नोंदणी

वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची वानवा यामुळे शहरातील बडी गृहसंकुले, विकासक, खासगी व्यावसायिक आस्थापना आणि वाहतूकदारांच्या युतीतून ठाण्यात खासगी बस वाहतूक फोफावू लागली आहे. अर्थार्जनाच्या या नव्या संधीचा शोध घेणाऱ्यांनी गेल्या वर्षभरात तब्बल ७६० खासगी बसची नोंद प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात केली आहे.

विस्तारलेल्या ठाण्यातील रहिवाशांनी ठाणे स्थानक गाठण्यासाठी खासगी बसचा पर्याय स्वीकारल्यामुळे वाहतूकदार बनू पाहणारे सध्या बडय़ा विकासकांच्या कार्यालयांत या कामासाठी जोडे झिजवत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात पोहचली आहे. घोडबंदर भागातही गेल्या काही वर्षांत पाच लाखांहून अधिक नागरिक वास्तव्यास आले आहेत. राज्य सरकारने या भागात बांधकाम व्यावसायाला चालना मिळावी यासाठी काही वर्षांपूर्वी विशेष नागरी वसाहतींची आखणी केली. तब्बल चार चटईक्षेत्र पदरात पाडून घेत लोढा, हिरानंदानी, रुस्तमजी, कल्पतरू, दोस्ती, विजय ग्रुप, पुराणिक या विकासकांनी घोडबंदर पट्टय़ात लहान-मोठय़ा नागरी वसाहतींची उभारणी केली. तिथे आता हजारो नवे ठाणेकर वास्तव्यास आले आहेत, मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजूनही सक्षम झालेली नाही. या संपूर्ण शहरासाठी ठाण्यात एकमेव रेल्वे स्थानक आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा ढिसाळ कारभार आणि रिक्षाचालकांची मनमानी यामुळे नव्या ठाण्यातून रेल्वे स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी गेल्या काही वर्षांत खासगी बसचा नवा पर्याय बाळसे धरू लागला आहे.

सुरुवातीला बऱ्याच बस अवैध पद्धतीने धावायच्या. स्थानिक राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली ही व्यवस्था सातत्याने वादात सापडत असते. ठाण्याचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी अशा अनेक अवैध बसवर कारवाई केली होती. अजूनही अधूनमधून कारवाई होत असली तरी अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम बसलेला नाही.

असे असताना गेल्या वर्षभरात ही नवी व्यवसाय संधी शोधत अनेकांनी वाहतूकदार कंपन्यांची स्थापना करत परिवहन विभागाकडून रीतसर प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाण्यातील खासगी वाहतुकीचा हा सार्वजनिक मार्ग आता वेगाने फोफावू लागल्याचे दिसते.

७५० नव्या बसगाडय़ांची नोंदणी

ठाणे प्रादेशिक वाहतूक विभागात गेल्या वर्षभरात ७६० खासगी बसगाडय़ांची नोंद झाली आहे. गेल्या चार महिन्यांत २७५ नव्या बसची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस शाळेच्या बसमध्येही वाढ होत असून वर्षभरात ६६ नवीन बसची नोंद करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांतर्फे या खासगी बसवर सातत्याने कारवाई करण्यात येत असली तरी घोडबंदर, कासारवडवली, मानपाडा, कोपरी भागात अद्याप बेकायदा वाहतूक सुरूच आहे. मानपाडा, कोपरी अशा ठिकाणी या खासगी बस उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

१०-२० रुपयांत सेवा

* ठाणे रेल्वे स्थानक ते घोडबंदर असा लांबचा प्रवास करणाऱ्यांकडून रिक्षाचालक मोठय़ा प्रमाणात भाडे उकळतात. त्यामुळे हीच सेवा १० ते २० रुपयांत देणाऱ्या खासगी बस रहिवाशांसाठी सोयीस्कर ठरत आहेत.

* हिरानंदानी इस्टेट भागात खासगी बसप्रवासासाठी महिन्याला ८०० ते १००० रुपये भाडे आकारले जाते. विकासकाच्या कार्यालयात हे पैसे भरून मासिक पास विकत घेता येतो. या वसाहतींसाठी ही योजना आहे. कासारवडवलीतही काही वसाहतींमध्येही अशीच योजना आहे.

*  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घोडबंदर तसेच आसपासच्या पट्टय़ातून दररोज १३०० हून अधिक बस रेल्वे स्थानक, भाईंदर, पवई, अंधेरी या मार्गावर धावतात.

खासगी बसच्या संख्येत वर्षभरात वाढ झाली आहे. मात्र नवीन वाहनांच्या नोंदणीवर कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे सर्वच वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे.

– नंदकिशोर नाईक, ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी