स्थानिक परिवहन उपक्रमांच्या नाकर्तेपणामुळे ठाणे, डोंबिवलीतील प्रवाशांनी आता वाहतुकीचे खासगी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या या शोधमोहिमेमुळे ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मात्र बेकायदा वाहतुकीचे पेव फुटले आहे. ‘टीएमटी’ बससेवेचा उडालेला बोजवारा आणि स्थानिक रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे येथील सार्वजनिक वाहतुकीची दैना झाली आहे. कल्याण, डोंबिवली परिसरात अंतर्गत वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी फारसे प्रयत्न होत नसल्याने तेथील रिक्षाचालकांनी प्रवाशांचा जीव मेटाकुटीस आणला आहे. टीएमटीचा कारभार सुधारत नाही आणि रिक्षाचालक ऐकत नाहीत, यामुळे वैतागलेल्या ठाणेकर प्रवाशांनी रेल्वे स्थानक ते घोडबंदर मार्ग या मार्गावर धावणाऱ्या बेकायदा बस वाहतुकीला आपलेसे केले आहे. ठाण्यातील सत्ताधारी राजकीय पक्षांचा नाकर्तेपणा, टीएमटीचे भोंगळ व्यवस्थापन आणि मुजोर रिक्षाचालकांना प्रवाशांनी दिलेली ही चपराकच म्हटली पाहिजे. डोंबिवली-वाशी-बेलापूर या मार्गावर प्रवाशांची प्रचंड मागणी असूनही तेथे ही सुविधा पुरविण्यात एनएमएमटी आणि केडीएमटी व्यवस्थापनाला यश आलेले नाही. त्यामुळे या मार्गावरही बेकायदा बस वाहतूक फोफावली
आहे. तेव्हा, प्रवाशांची मोठी मागणी असूनही पुरेशी सुविधा पुरविण्यात सातत्याने अपयशी ठरणाऱ्या या परिवहन सेवांना तोटय़ाचे रडगाणे गाण्याचा अधिकार आहे का, असा सवालच आता उपस्थित होऊ लागला आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गाच्या पश्चिमेकडे विस्तारत जाणाऱ्या नव्या ठाण्याच्या नागरीकरणाचा वेग जबरदस्त आहे. सुमारे १२ लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरासाठी एकमेव रेल्वे स्थानक आहे. कळवा आणि मुंब््रयाचा अतिरिक्त भारही या स्थानकावर पडतो तो वेगळाच. अशा गर्दीच्या स्थानकाकडे जाण्यासाठी ठाणेकरांना उपलब्ध असलेली वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस अपुरीच ठरत आहे. टीएमटीच्या अध्र्या अधिक बसेस दुरुस्तीच्या कारणामुळे आगारात उभ्या असतात. घोडबंदर ते ठाणे स्थानक रिक्षा प्रवासाचे आर्थिक गणित तर परवडण्यापलीकडे पोहचले आहे.
या पाश्र्वभूमीवर घोडबंदर मार्गावरील वस्त्या वस्त्यांमधून सुरू झालेल्या बेकायदा बस वाहतुकीने या भागात चांगलाच जम बसविला आहे. अवघ्या दहा किंवा २० रुपयांमध्ये ठाणे स्थानक ते घरपोच अशी ही सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांनाही ती सोयीची ठरू लागली आहे. मध्यंतरी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी एक आदेश काढत बेकायदा वाहतुकीला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश काढले. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील ही बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी डावखरे यांच्या नावाने भर रस्त्यात अक्षरश: खडे फोडल्याचे चित्र पाहायला मिळाले. टीएमटीचा नाकर्तेपणा आणि रिक्षाचालकांची मुजोरी मोडीत निघत नसल्यामुळे ठाणेकरांना बेकायदा वाहतूक आपली वाटू लागल्याचेच हे द्योतक आहे.
आश्चर्यकारक बाब ही की, बेकायदा बस वाहतुकीला तुफान प्रतिसाद मिळत असताना या मार्गावर प्रभावी बस वाहतूक सुरू करण्यात टीएमटीला काहीही स्वारस्य नसल्याचे चित्र आहे. यामध्ये अर्थातच खासगी वाहतूक सेवा पुरवठादार, स्थानिक राजकीय नेते आणि टीएमटीतील प्रशासनाचे हितसंबंध गुंतल्याचे जाणवते.
जयेश सामंत

Story img Loader