डोंबिवली – मुंबई-गोवा या १२ वर्षांपासून रखडलेल्या रस्ते कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आतापर्यंत चार हजार ५०० कोटींचा निधी वितरित केला आहे. तरीही निधी आणि अन्य काही कारणे देऊन या महत्त्वपूर्ण रस्त्याचे काम रखडवले गेले. या रस्ते कामाच्या यापूर्वीच्या सर्व खर्चाचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी येथे केली.

अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करणार. या कामाची एक मार्गिका कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी खुली करण्याचा निर्धार मंत्री चव्हाण यांनी केला आहे. तरीही, या कामावरून मनसेने तोडफोड आंदोलन केले. जागर यात्रा सुरू केली आहे. मनसेच्या या श्रेयवादाच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री चव्हाण यांच्यातर्फे रविवारी डोंबिवली जिमखाना येथे गोवा महामार्ग रखडण्यामागील कारणे, स्थानिकांचे प्रश्न आणि त्यावर उपाय याविषयी कोकणवासीयांबरोबर चर्चा करण्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते. कोकण विकास समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, पण…”, मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका

कोकण विभागातून आलेल्या नागरिकांनी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नांना चव्हाण यांनी भाषणातून उत्तरे दिली. हा रस्ते प्रकल्प का रखडला, याविषयी चर्चा करण्याऐवजी आता कोकणातील मंडळींनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. संघटितपणे हा महत्त्वपूर्ण रस्ता पूर्ण होण्यासाठी शासनाला साथ दिली तर हा रस्ता दिलेल्या मुदतीत पूर्ण होईल. या पुलाची एक मार्गिका गणपतीपूर्वी कोकणवासीयांना खुली केली जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. यापूर्वी हा महामार्ग का, कोणी, कसा रखडवला हे सर्व कोकणवासीयांना माहिती आहे. या विषयात न जाता आता हा रस्ता पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी केला आहे. या तिन्ही मंत्र्यांकडून दररोज या रस्ते कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. कोकणचा एक रहिवासी म्हणून मला वैभवशाली कोकणाविषयी तळमळ आहे. शासनाकडून मंत्री म्हणून मला अधिकारी मिळाले आहेत. त्याचा पुरेपूर लाभ उठवून मी कोकणवासीयांच्या सर्वांगीण हिताचा विचार करून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता कोणी या रस्ते कामात अडथळा आणला, आडवे येण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा मंत्री चव्हाण यांनी दिला.

मंत्री, आमदार म्हणून मी आज आहे. उद्या नसेनही. आता हातात अधिकार असताना हे काम मागे पडले तर ते पुन्हा पूर्ण होईल याची शाश्वती नाही. येणारी पीढी या रखडलेल्या कामावरून आपणास माफ करणार नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी या रस्ते भागात ठाण मांडून आहोत. सीटीबी तंत्रातील चार पेव्हर यंत्र या रस्त्यासाठी काम करत आहेत. पाऊस असला तर ८५० मीटर नसेल तर दररोज एक किमी रस्ता बांधून पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा – ठाणे पालिकेतील ४५ सफाई कामगारांना थकीत वेतन मिळणार

२००९ पासून आपण या रस्त्यासाठी विधीमंडळात अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत आहोत. त्यावेळी निधी कुठून आणायचा असे प्रश्न केले जात होते. आता अधिकार प्राप्त झाल्यापासून वाट्टेल ते करून हा रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्याचे नियोजन आहे. खेळ पूर्ण झाल्याशिवाय मैदान सोडण्याची आपली वृत्ती नाही. स्थानिकांनी या कामासाठी यंत्रणा, ठेकेदार उपलब्ध करून द्यावे. त्या यंत्रणा कामाला लावू. अधिक गतिमानतेने हे काम विहित मुदतीच्या आत पूर्ण करू, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. कोकणासाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा विचार शासन करत आहे, असे चव्हाण म्हणाले.

Story img Loader