शाळा, विद्यार्थी विकासासाठी शासन आपल्या परीने सर्वोतपरी काम करत आहे. येत्या काळात धनवानांच्या शाळांबरोबर टिकायचे असेल सामान्य शाळांमधील विद्यार्थी, शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि दाते लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.
हेही वाचा >>>भिवंडी महापालिकेकडून थकबाकीदरांना दणका; थकबाकीदारांच्या मालमत्ता नाममात्र दराने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु
रेल चाईल्ड संस्थेच्या डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्या वरील महात्मा गांधी विद्यामंदिरात सरसंघचालक डाॅ. केशव बळीराम हेडगेवार सभागृहाची बांधणी करण्यात आली आहे. या नूतन सभागृहाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे कल्याण जिल्हा संघचालक डाॅ. विवेक मोडक, रेल चाईल्ड संस्था अध्यक्ष नितीन दिघे, कार्यवाह भगवान सुरवाडे, कोषाध्यक्ष उल्हास झोपे, शाळा समिती अध्यक्ष गिरीष जोशी, माजी मुख्याध्यापक अंकुश आहेर, मुख्याध्यापक अजयकुमार जोगी, मुख्याध्यापक सुरेश बोरसे उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते व मनसे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी शाळेतील दुर्बल घटकातील दत्तक मुलांच्या सुविधेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश शाळा पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला. दरवर्षी ते अशाप्रकारची मदत शाळेला करतात.
हेही वाचा >>>कशेळी खाडी पुलावर मातीचे ढिगारे ‘जैसे थे’च; पुलावर अपघातांची भीती कायम
‘सरकार, शासन राज्यातील शाळा, विद्यार्थी विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवित आहे. यापुढे प्रत्येक ठिकाणी शासनच पुढे येईल असे नाही. शाळेत किरकोळ दुरुस्ती, काही काम करायचे असेल तर त्यासाठी शासन जरुर मदत देईल. ती मदत मिळण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर दाते, माजी विद्यार्थी यांचे संघटन करुन शाळेत विदयार्थी हिताच्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या तर या तत्पर सुविधांनी नक्कीच शाळेचा, दात्यांचा नावलौकिक वाढणार आहे, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा >>>‘ईडी’कडून कल्याण-डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची चौकशी, बेकायदा बांधकामांचे अहवाल ‘ईडी’, ‘एसआयटी’कडे दाखल
धनवानांच्या शाळांमध्ये झकपकपणाला भुलून पालक लाखो रुपये मुलाच्या शिक्षणासाठी भरणा करत आहेत. जे सामान्य शाळेत शिकवले जाते तेच धनवानांच्या शाळेत शिकवले जाते. पालकांचा ओढा अलीकडे झकपक पणाकडे अधिक असल्याने आणि स्पर्धात्मक काळात टिकण्यासाठी आता प्रत्येक शाळेने या स्पर्धेत उतरणे गरजेेचे झाले आहे. आमची शाळा गरीब, आमच्या शाळेतील विद्यार्थी दुबल घटकातील असे बोलून चालणार नाही. यासाठी शाळा संस्थांनी स्थानिक पातळीवर दाते, माजी विद्यार्थी, संघ कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांचे साहाय्य घेऊन शाळांमध्ये मूलभुत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या सुविधांकडे पाहून पालकांना माझ्या मुलाला महात्मा गांधी विद्यामंदिरात प्रवेश कसा मिळेल यासाठी धडपड सुरू झाली पाहिजे. या धडपडीतून बाहेर शाळेविषयी एक चांगला संदेश जातो. यामधून विद्यार्थी पटसंख्या वाढते, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
राष्ट्र निर्माणाच्या उभारणीत आता सगळ्यांचे हात लागणे गरजेचे आहे. सरकार, शासन करील आणि आम्ही बघत बसू असे यापुढे चालणार नाही. विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांनी आपल्या शाळेचे भवितव्य ओळखून यादृष्टीने कामाला लागणे आवश्यक आहे, असे मंत्री चव्हाण म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्तावित सुरवाडे यांनी केले. शिक्षिका प्रज्ञा कुलकर्णी, प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले.