पालिका आयुक्ताने विकास कामांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. लोकप्रतिनिधींशी कामा पुरते संबंध ठेवावेत. मागच्या अडीच वर्षापासून कल्याण डोंबिवली पालिकेत येणारे आयुक्त प्रशासकीय अधिकारी म्हणून न येता, जावया सारखे येऊन काम करत आहेत. हुजरेगिरीतील या आयुक्तांनी विकास कामांचा विचका केला आहे. कडोंमपाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्याचे चटके लोकांना बसत आहेत, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी येथे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे स्थानकात भाजप-शिवसेनेची घोषणाबाजी

ही टीका करताना मंत्री चव्हाण यांचा टीकेचा रोख नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खा. पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनॅशनल शाळेतील अद्ययावत प्रेक्षागृहाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, लो. टिळक रुग्णालयाचे माजी डीन डॉ. अविनाश सुपे, जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, कार्यकारी अध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्यकारी अध्यक्ष प्रदीप गोसावी, प्राचार्या नीलजा पाटील, उपप्राचार्या तृप्ती तोमर यांच्या उपस्थितीत झाले.

डॉ. कोल्हटकर यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांचा विषय उपस्थित केला. या विषयावरुन मंत्री चव्हाण म्हणाले, मी अडीच वर्षापूर्वी ४७२ कोटीचा काँक्रिट रस्ते कामासाठी डोंबिवली साठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करुन घेतला. राज्यात मविआ सरकार आले. कोणाला दुर्बुध्दी सुचली. आपला प्रस्ताव गुंडाळण्यात आला, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.विकास प्रकल्प मार्गी लावणे आयुक्तांचे काम आहे. अडीच वर्षापासून कडोंमपामध्ये आयुक्त म्हणून येणारे अधिकारी नगरसेवक नसल्याने मनमानी करत आहेत. गॉडफादर पाठीशी असल्याने डोक्यावर चढले आहेत. जावई सारखी त्यांना वागणूक मिळते. १५ कोटी खर्च करुन कडोंमपात हद्दीत खड्डे पडले. विकास निधी रद्द करुन लोकांशी खेळ कोणी खेळू नये, असा टोला मंत्री चव्हाण यांनी लगावला.डोंबिवलीचा ४७२ कोटीचा निधी खुला करावा म्हणून नाट्य कलाकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना गळ घालावी.

हेही वाचा >>> उल्हासनगरात इमारतीचा काही भाग शेजारील बैठ्या घरावर कोसळून वृद्धाचा मृत्यू

डोंबिवलीत सुतिकागृहाच्या ठिकाणी डॉ. कोल्हटकर यांच्या पुढाकाराने रोटरीतर्फे रुग्णालय उभारण्यात येणार होते. त्यात काहींनी खोडा घातला, अशी टीका चव्हाण यांनी केली. सहा वर्षापासून माणकोली पूल, आठ वर्षापासून शिळफाटा रस्त्याचे काम सुरू आहे. संथगती सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत त्यांना कोणी जाब विचारणार की नाही. हे सर्व प्रकल्प मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिपत्त्याखाली आहेत, अशी पुस्ती चव्हाण यांनी जोडली. डोंबिवलीत अद्ययावत प्रेक्षागृह उभारल्या बद्दल जनरल एज्युकेशन संस्थेचे त्यांनी कौतुक केले.

७२ तासात खड्डे बुजवा
रस्त्यावर पडलेला खड्डा ७२ तासात बुजलाच पाहिजे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक अध्यादेश काढला जाणार आहे. हा अध्यादेश सर्व रस्ते बांधकामाशी संबंधित यंत्रणांना लागू करण्याचा विचार आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

मूल्याधिष्ठीत शिक्षण
आता जे आपण शिक्षण घेतो. त्या माध्यमातून आपणास येत्या २५ वर्षात नोकऱ्या मिळणे शक्य नाही. आता वास्तवदर्शी, मूल्याधिष्ठीत शिक्षणाची खूप गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी अशी प्रेक्षागृहे महत्वाची भूमिका बजावतील, असे ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Public works minister ravindra chavan criticism of kalyan dombivli municipal commissioner son in law behavior amy