डोंबिवली : पै फ्रेन्डस लायब्ररीतर्फे डोंबिवलीत सावळराम महाराज क्रीडासंकुलातील दिवंगत सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडासभागृहात आयोजित पुस्तक अदान प्रदान कार्यक्रमात यावेळी एक लाख पुस्तकांची अदान प्रदान होईल, असा विश्वास या उपक्रमाचे आयोजक पै फ्रेन्डस लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांंनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे यावेळी पुस्तक अदान प्रदान उपक्रमावर त्याची छाप आहे. एक लाखाहून अधिक पुस्तकांची मांडणी दोन भागात सभागृहात करण्यात आली आहे. एका भागात नागरिकांनी घरी वाचून आणलेली पुस्तके स्वीकारण्यासाठी आणि त्या बदल्यात त्यांच्या आवडीची पुस्तके घेऊन जाण्यासाठी एक स्वतंत्र दालन आहे. तर एक दालन नागरिकांना त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करता यावी यासाठी आहे. कथा, कादंबऱ्या, ललित, नाट्य असे विविध प्रकारचे साहित्य विश्व एका छताखाली पाहण्याची संधी वाचनप्रेमी नागरिकांनी पै फ्रेडन्स लायब्ररी, कल्याण डोंबिवली पालिका आणि डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२०१७ पासून या उपक्रमाला डोंबिवलीत सुरूवात करण्यात आली. युरोपात एक दिवस पुस्तकांसाठी असा उपक्रम रस्त्यावर आयोजित केला जातो. हाच उपक्रम डोळयासमोर ठेऊन डोंबिवलीत या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. पुस्तक अदान प्रदान उपक्रमात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, भिवंडी परिसरातून नागरिक आवर्जून सहभागी होत आहेत. तरूण पीढी वाचत नाही, असे म्हटले जात असले तरी पुस्तक अदान प्रदान कार्यक्रमात तरूण मुले, शाळकरी विद्यार्थी अधिक प्रमाणात सहभागी होत आहेत, असे पुंडलिक पै यांनी सांगितले. शासनाच्या आर्थिक साहाय्याविना हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तो यशस्वी होतो, असे पै यांनी सांगितले.
हा उपक्रम डोंंबिवली शहराबाहेर न्यावा, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. शासनाने या उपक्रमाला साहाय्य केले तर नक्की शासनाच्या मागणीचा आम्ही विचार करू, असे पै यांनी सांगितले. पै फ्रेन्डस लायब्ररीत सुमारे साडे चार लाखाहून अधिक पुस्तके आहेत. मुंबई, पुणे परिसरात वाचकांना दैनंदिन पुस्तक सेवा दिली जाते.डोंबिवलीत भव्य पै फ्रेन्डस पुस्तक भवन उभारणीचे स्वप्न आहे, असे पै यांनी सांगितले.
हेही वाचा…ठाणे रेल्वे स्थानकात आढळली अमली पदार्थाने भरलेली बेवारस बॅग, लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुस्तक अदान प्रदान उपक्रमामुळे वाचक संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसले. तरूण, तरूणी, शाळकरी विद्यार्थी आवडीने या उपक्रमात सहभागी होत आहेत. यावेळी एक लाख पुस्तकांचे अदान प्रदान होईल, असा विश्वास आहे. पुंडलिक पै संचालक, पै फ्रेन्डस लायब्ररी.