शास्त्रीय संगीतात जशी गाण्यात घराणी असतात, तशी खाण्याची घराणी असती तर त्यातलं ठळक नाव असतं ‘चितळे’ घराणं. चितळे म्हणजे विशिष्ट शैली. चितळ्यांच्या घराण्यानं पदार्थांना खास चव, दर्जा दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तीनचार पिढ्यांनंतरही टिकवून ठेवला. या घराण्याच्या चवीचं व्याकरण निर्माण केलं भास्कर गणेश चितळे यांनी १९२०मध्ये. सातारा जिल्हय़ातल्या या छोटय़ाशा गावात सुरू झालेल्या आणि १९३९ मध्ये सांगली जिल्हय़ातल्या ‘भिलवडी’त स्थलांतरित झालेल्या दुधाच्या घरगुती व्यवसायाचं बघता बघता प्रचंड मोठ्या उद्योगात रूपांतर झालं. प्रतितास तीनशे किलो या हिशोबानं दररोज साडेचार टन बाकरवडी तयार होते. दसरा-पाडवा वा कुठलाही सण, पुणेकरांना चितळेंच्या दुकानात जायला जणू पर्याय नसावा असं चित्र. आता ठाने तिथे काय उणे असं म्हणावं लागेल. कारण चितळे बंधूंच्या बाकरवड्यांसह सर्व पदार्थांची चव आता ठाणेकरांनाही चाखता येणार आहे.
चितळे बंधूंचं चितळे एक्स्प्रेस आता ठाण्यातही सुरू होणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी चितळे बंधूंच्या चितळे एक्स्प्रेस या दुकानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. ठाण्यातील गोखले रोडनजीक असलेल्या गौतम टॉवर्स या ठिकाणी चितळे बंधूंचं नवं दुकान सुरू होणार आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसंच यावेळी भाजपा आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
चितळे म्हणजे बाकरवडी हे समीकरण जुळलं १९७०-७१ मध्ये. लोकांना दुकानाशी बांधून ठेवायचं तर पारंपरिक पदार्थाच्या बरोबर काही नवं सुद्धा द्यायला हवं, हे लक्षात आल्यानं नव्या पदार्थाचा शोध सतत सुरू असे. राजस्थानी-पंजाबी असे विविध पदार्थ खाऊन त्यात कुठले बदल केल्यास ते मराठी चवीला आवडतील यावर कुटुंबात चर्चा होत. अशीच एकदा राजाभाऊंनी नागपूरहून पुडाची वडी आणली. पुडाची वडी आणि गुजराथी बाकरवडी या दोन्हीपेक्षा वेगळी, खास चवीची बाकरवडी त्यांनी बनवली आणि अक्षरश: इतिहास घडला.