उल्हासनगर केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर राज्य सरकारने राज्यभरात एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणी करत उल्हासनगर महापालिकेने गेल्या महिनाभरात २४ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत पालिकेने १ लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल केला असून पालिकेच्या अचानक या धाडसत्रामुळे प्लास्टीक विक्रेते आणि दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
एकेकाळी प्लास्टिक निर्मिती आणि साठवणुकीचा कारखाना म्हणून उल्हासनगर शहराची ओळख होती. सोबतच थर्माकॉल निर्मिती, त्यापासूनच्या विविध वस्तू, प्लास्टिक पिशव्या निर्मितीचे मोठे काम उल्हासनगरातून केले जात होते. मात्र राज्य शासनाने बंदी घातल्यानंतर हे उद्योग काही प्रमाणात बंद झाले. यातील काही कंपन्या शेजारच्या राज्यात स्थलांतरीत झाल्या. त्याचवेळी काही कंपन्या मात्र छुप्या पद्धतीने सुरू होत्या. त्याही मध्यंतरीच्या काळात बंद झाल्या. प्लास्टिक वस्तूंचा साठा मात्र होत होता. त्याची विक्रीही केली जात होती. या महिन्यापासून केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर राज्यात एकल प्लास्टीक वापरावर बंदी आली आहे. सुरूवातीला उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.
यात काही दिवस गेल्यानंतर उल्हासनगर महापालिकेने प्लास्टिक साठा, वापर आणि विक्री करणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात विविध ठिकाणी २४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यात १ लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बुधवारीही अशाच प्रकारे उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने विविध ठिकाणी अचनाक धाडी टाकून प्लास्टीक वापरकर्त्यांवर कारवाई केली. यात चार व्यक्तींविरूद्ध पहिला गुन्हा तर एक व्यक्तीविरूद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. यातून पालिकेने ३० हजार रूपयांचा दंड तर बंदी असलेले ३२९ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. यापुढेही ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असून अचानकपणे धाडी टाकत प्लास्टिकचा वापर, साठवण आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे. पालिकेने एकल वापराच्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी पथकांची निर्मिती केली असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या या अचानकच्या धाडींमुळे विक्रेते आणि साठवण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.