डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील सर्वाधिक वर्दळीच्या नेहरू रस्त्यावर शिधावाटप दुकानाच्या बाजुला स्वच्छता गृहाच्या कोपऱ्यावर मागील अनेक महिन्यांपासून सकाळपासून तीन पानांचा जुगार अड्डा सुरू आहे. हा जुगार अड्डा एक पंजाबी भाई चालवित असल्याच्या नेहरू रस्त्यावरील चर्चेतून समजते.

या जुगार अड्ड्यावर झटपट पैसा मिळत असल्याने अनेक जुगार खेळणारे जुगारी सकाळपासून नेहरू रस्त्यावर फिरत असतात. २० ते २५ वयोगटातील तरूण या जुगार अड्ड्यावर तीन पानी जुगार खेळत असतात. परिसरातील रहिवासी या दररोजच्या प्रकाराने त्रस्त आहेत. अनेक वेळा या जुगार अड्ड्यावर पैशांवरून वादावादी, हाणामारी होते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

स्वच्छतागृहात, येथील शिधावाटप दुकानात येणाऱ्या नागरिकांना या जुगार अड्ड्याचा त्रास होतो. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो. नेहरू रस्त्यावर मजुर कामगारांचा नाका आहे. दोन ते अडीच हजार मजूर कामगार याठिकाणी काम मिळविण्यासाठी सकाळपासून ते अकरा वाजेपर्यंत नाक्यावर उभे असतात. या रस्त्यावर बाजुलाच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. गणेश मंदिरात जाण्यासाठी अनेक ज्येष्ठ, वृध्द या रस्त्यावरून येजा करतात. त्यांनाही हा मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पाहून आश्चर्य वाटते.

या जुगार अड्ड्या भोवती काही मद्यपी, गर्दुल्ले यांची वर्दळ असते. स्वच्छता गृहात महिला, पुरूष नागरिकांची येजा असते. या नागरिकांना जुगार अड्ड्यावरील जुगारी, मद्यपी, गर्दुल्ले यांचा उपद्रव होतो. जुगार अड्ड्यावर उघडपणे पैशाची उलाढाल होते. या तीन पानी जुगार अड्ड्यावर झटपट पैसा मिळत असल्याची माहिती असल्याने डोंबिवली शहराच्या विविध भागातील जुगारी जुगार अड्ड्यावर सकाळीच हजर असतात. एका भाईच्या आशीर्वादाने हा अड्डा चालविता जातो. त्यामुळे या जुगार अड्ड्याला कोणी विरोध करायला गेले की त्याला तेथेच रोखले जाते, अशा तक्रारी आहेत.

यासंदर्भातच्या अधिक माहितीसाठी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांना सतत संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गोपीनाथ चौकात अड्डा डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौकात धवनी सोसायटीच्या समोर आणि विश्वनाथ सोसायटीच्या बाजुला कचरा कुंडीच्या जागेत एक पडिक तळ मजल्याचे बांधकाम आहे. या पडिक बांधकामाला रस्त्याच्या बाजुने हिरवी जाळी लावून जुगार खेळणाऱ्या तरूणांनी याठिकाणी जुगार अड्डा तयार केला आहे. याठिकाणी चोवीस तास जुगार अड्डा सुरू असतो. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी घरातून जुने फेकून दिलेले सोफे, खुर्च्या जुगारींनी याठिकाणी बसण्यासाठी आणून ठेवल्या आहेत. जुगार अड्ड्या बरोबर येथे अंमली पदार्थांचे सेवन, मद्य सेवन केले जाते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. या रस्त्यावरील विद्यार्थी, पालक यांची सतत येजा असते. विष्णुनगर पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Story img Loader