सध्या फास्टफूडचा जमाना आहे. त्यामुळे साहजिकच पावभाजी, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थाची बाजारात रेलचेल आहे. मात्र या नव्या नवलाईतही जुन्या काळात घरी न्याहरीसाठी बनविल्या जाणाऱ्या पदार्थाची चव वडीलधाऱ्या मंडळींच्या जिभेवर रेंगाळत असते. त्यातूनच आजी, काकू तसेच आईच्या हातच्या विशिष्ट पदार्थाचे कौतुक घरोघरी होत असते. त्याची रसभरीत वर्णने ऐकून नव्या पिढीच्या तोंडालाही पाणी सुटते. धावपळीच्या या युगातही दडपे पोहे, आंबोळ्यांची आठवण होत असते. गावाकडच्या याच पदार्थाची चव आपल्याला शहरातही चाखता यावी, यासाठी डोंबिवली पूर्व येथील पूर्णब्रह्म टेम्पटेशन या दुकानाने पुढाकार घेतला आणि शहरातील नागरिकांनीही घरगुती पदार्थ खाण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी केली आहे.

गावाकडे न्याहरीसाठी बनविले जाणारे पदार्थ अधिक रुचकर आणि पौष्टिक असतात. मात्र शहरात धावपळीच्या जीवनशैलीत घरात ते पदार्थ बनवायला फारसा वेळ नसतो. त्यामुळे हे पारंपरिक पदार्थ बनवून देण्याची कल्पना दिगंबर नेरुळकर आणि किशोर खळे या दुकलीस सुचली. त्यातूनच त्यांनी खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या न्याहरीचे दुकान थाटले. दडपे पोहे, समोसे, रगडा पॅटिस, मटार करंजी, थालीपीठ, साबुदाणा वडा, पांढरा ढोकळा, मिनी वडे, मिसळ, घावणे-चटणी आदी पदार्थाचा यात समावेश आहे. शिवाय गोड पदार्थामध्ये खरवस, धोंडस, मोदक, मँगो मोदक आदी पदार्थ येथे खवय्यांना मिळतात.

त्यातील धोंडस हा गोड पदार्थ फक्त कोकणातच तयार केला जातो. त्यामध्ये तूप, तांदळाचा रवा, काकडी, भोपळा आदी पदार्थाचा कीस टाकला जातो. तसेच गूळ, दूध, रवा आदी जिन्नसांच्या मिश्रणाने हा पदार्थ बनविला जातो. या पदार्थाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद असून अस्सल कोकणी पदार्थ खाल्ल्याने गावात गेल्यासारखेच वाटते, अशी पसंतीही खवय्ये देत आहेत. तांदूळ रात्री भिजवून ठेवून सकाळी वाटले जातात. त्यामुळे त्यापासून बनविलेल्या आंबोळ्या मऊ, लुसलुशीत असतात. चहा, मटणाचा रस्सा, काळ्या वाटाण्याची उसळ, चटणी आणि आमटीपैकी कोणताही एक पदार्थ सोबतीला असला की आंबोळी खाण्याची मजा काही औरच..

मटार करंजी हाही येथे मिळणारा सुप्रसिद्ध पदार्थ आहे. ती सदैव गरम मिळेल, याची व्यवस्था केली जाते. स्नेहल नेरुळकर आणि सेजल खळे यांच्या देखरेखीखाली पूर्णब्रह्मच्या किचनचे कामकाज चालते. दडपे पोहे आणि घावणे चटणी ‘मिळून पाचजणी’ या डोंबिवलीतल्या महिला चमूकडून करवून घेतल्या जातात. गरमागरम आणि चिखट खाल्ले, की काही तरी थंड प्यावेसे वाटते. अशा वेळी तहान भागविण्यासाठी कोकम सरबत तसेच पन्हे आदी अस्सल देशी पेय येथे मिळतात. एका दिवसाला ५ किलो दडपे पोहे येथे सहज संपतात. तसेच इथल्या दोन आंबोळ्या खाल्ल्या की पोट भरते. खवय्ये अगदी तृप्त मनाने ढेकर देऊन जातात. दुकानाबाहेर जागा असल्याने खुर्चीवर बसूनही हे पदार्थ खाता येतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींबरोबर गप्पागोष्टी करत अस्सल कोकण पदार्थावर येथे ताव मारता येतो. लोण्याचा मऊसूत गोळा हळूहळू वितळत असलेले गरमागरम चविष्ट थालीपीठ खाण्यातली मजा काही औरच आहे. त्याचबरोबर येथे अनेकांच्या खास आवडीचे असणारे खरवस मिळते. दिवसभरात दोन ते तीन किलो खरवस येथे अगदी सहज संपतो. मोदक मोठा असल्याने एक प्लेटमध्ये एकच मोदक दिला जातो. मात्र एक मोदक खाऊनही मन तृप्त होते असे नेरुळकरांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे बेळगावची ओळख असणारा कुंदा तसेच बालुशाही येथे उपलब्ध आहे. तसेच बंगळुरूवरून लाकडी भट्टीत भाजलेले बटर, टोस्ट आदी पदार्थही खवय्ये आवडीने घेऊन जात असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारचे विविध प्रांतांतील पदार्थ डोंबिवलीमध्ये एकाच ठिकाणी येथे उपलब्ध आहेत. इथे प्रत्येक पदार्थाचा खास दिवस आहे. तो पदार्थ त्या त्या दिवशीच बनविला जातो. अस्सल खवय्यांना हे वेळापत्रक आता माहिती झाले आहे.

सोमवारी समोसे आणि दडपे पोहे, मंगळवारी मटार पॅटिस आणि रगडा पॅटिस, बुधवारी समोसे आणि थालीपीठ, गुरुवारी साबुदाणा वडा आणि मटार क रंजी,  शुक्रवारी रगडा पॅटिस आणि पांढरा ढोकळा, शनिवारी मिनी वडे आणि दडपे पोहे आणि रविवारी

मिसळ घावणे, आंबोळ्या आणि चटणी असे पदार्थ मिळतात. तसेच गोड पदार्थामध्ये सोमवार, मंगळवार आणि शनिवारी खरवस, बुधवार आणि शुक्रवारी धोंडस, गुरुवार आणि रविवारी मोदक उपलब्ध असतात. २० ते ५० रुपयांपर्यंत हे विविध पदार्थ उपलब्ध आहेत.

कुठे- ओमकार सोसायटी, कॉर्पोरेशन बँकेसमोर, भगतसिंग रोड, डोंबिवली, (पूर्व)

कधी- सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत

Story img Loader