पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे भरीव कार्य

दुर्गम प्रदेश आणि दुर्लक्षित धोरणामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहापासून काहीशा वंचित राहिलेल्या ईशान्य भारतामधील रहिवाशांसोबत संवाद साधण्यात मुंबईस्थित पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान यशस्वी ठरले आहे. चार दशकांपूर्वी शंकर दिनकर ऊर्फ भैयाजी काणे या कोकणातील ध्येयवेडय़ा शिक्षकाने ईशान्येकडच्या राज्यात मित्र जोडण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून या संवाद सेतूची पायाभरणी केली. विद्यार्थी आदानप्रदान योजना राबवून त्यांनी मणिपूरमधील मुला-मुलींना महाराष्ट्र तसेच देशाच्या अन्य प्रांतांत शिक्षणाच्या निमित्ताने आणले. भारत विरोधी अपप्रचार रोखण्यात या उपक्रमाचा चांगलाच फायदा झाला. स्वतंत्र भारताविषयी त्यांच्या मनात असलेला परकेपणा लोप पावून राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले भैयाजी काणे आणि त्यांचा विद्यार्थी जयवंत कोंडविलकर या गुरूशिष्यांनी मणिपूरवासीयांच्या मनात भारतीयांविषयी असलेल्या दुराव्याची भिंत तोडली. भैयाजी काणेंच्या निधनानंतर म्यानमारच्या सीमेवरील गावांमध्ये त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या स्मरणार्थ तीन शाळा सुरू केल्या.

‘राष्ट्रीय’वाद रुजविण्याचे मिशन

स्थानिकांना पुरेशा पायाभूत सुविधा, योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी दिल्या तरच सीमावर्ती भागातील फुटीरतावादी आणि दहशतवादी कारवाया कमी होऊ शकणार आहेत. सीमेपलीकडचे हे अतिक्रमण थोपवून धरण्यात लष्कराइतकेच अशा प्रकारचे सेवा प्रकल्पही तितकेच उपयोगी ठरत आहेत. पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान या महाराष्ट्रातील संस्थेने मणिपूरमध्ये हे दाखवून दिले आहे. प्रतिष्ठानतर्फे मणिपूरमध्ये राबविण्यात येत असलेल्या शिक्षण, रोजगार, आणि आरोग्यविषयक उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. प्रतिष्ठानचे हे सर्व कार्य विनाअनुदानित आणि स्वयंसेवी पद्धतीचे आहे. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांच्या आधारेच हे सर्व उपक्रम सुरू आहेत. संस्थेला तातडीने एक पक्की सुसज्ज इमारत उभारायची आहे. शाळेच्या वर्गामध्ये आसन व्यवस्था, अत्याधुनिक प्रयोगशाळा, खेळांची साधने व उपकरणे, सौर ऊर्जाप्रणाली, शिक्षकांसाठी निवास व्यवस्था, अतिथीगृह, रुग्णवाहिका, वाहन व्यवस्था, विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आदी प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत. देशाच्या ईशान्य सीमेवरील हे मदतकार्य अधिक परिणामकारक पद्धतीने राबविण्यासाठी त्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच तेथील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान आणि इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षक हवे आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या या देशकार्यात जास्तीत जास्त नागरिकांनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

मणिपुरातील तामेंगलाँग जिल्ह्य़ात पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानतर्फे चांलवण्यात येणारे विद्यालय.

Story img Loader