बदलापूर : गेल्या पाच वर्षांपासून कोणत्याही अधिकृत लोकप्रतिनिधीत्वाशिवाय असलेल्या मोठ्या राजकीय व्यक्ती, माजी नगरसेवक आणि इच्छुकांची दुसरी नगरसेवक पदाची टर्मही वाया जाते की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. रखडलेल्या नगरपालिकांमध्ये कुळगाव बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकांचा समावेश आहे. येत्या काही दिवसात या दोन पालिकांमध्ये नगरसेवक नसल्याच्या कार्यकाळाला पाच वर्ष पूर्ण होतील. जनसंपर्क टिकवून ठेवण्यासाठी झालेला खर्च आणखी किती काळ करायचा या विचाराने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगावर आलेले करोनाचे संकट आणि अंबरनाथ तसेच बदलापूर शहराच्या पालिकांचा कार्यकाळ संपण्याचा कालावधी एकच होता. करोनाच्या संकटात लागलेली टाळेबंदी तोंडावर आलेल्या निवडणुकांवर विरजण पाडून गेली. २०२० वर्षात एप्रिल महिन्यात अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. राज्यातील त्या काळात कार्यकाळ संपलेल्या आणि प्रशासकीय राजवट अनुभवणाऱ्या या दोन नगरपालिका होत्या. या प्रशासकीय राजवटीला आता लवकरच पाच वर्ष पूर्ण होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली निवडणुकांबाबतची सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे त्या तारखेला निकाल लागला तरी निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी पुरेसा कालावधी नसेल. परिणामी निवडणुका पावसाळ्यानंतर ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यातच होतील अशी शक्यता आहे. या बातमीने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून बांधणी केलेल्या प्रभागात जनसंपर्क टिकवण्यासाठी प्रत्येक सण उत्सवाला पैसे खर्च करावे लागतात. मात्र या सर्व इच्छुक आणि माजी नगरसेवकांची चक्क एक टर्म अर्थात पाच वर्षे वाया गेली आहेत. जर निवडणुकांचा निकाल लवकरच लागला नाही तर दुसरी टर्मही वाया जाते की काय असा प्रश्न उभा झाला असून या इच्छुकांच्या डोळ्यांना अंधारी आली आहे.

सध्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात हळदी कुंकू आणि इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांवर बक्षिसांची, भेटवस्तूंची लयलूट सुरू आहे. मात्र हे आणखी किती काळ करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे गणित कोलमडले आहे. सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ माजी नगरसेवक विकासकामांच्या माध्यमातून आर्थिक गणित जुळवत आहेत. मात्र इतरांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

कामांची यादी मोठी

निवडणुका कधी होतील याची धड तारीखही सांगता येत नाही. त्यात प्रभागा-प्रभागांत सोसायट्यांमधले नागरिक इच्छुक उमेदवारांकडे कामांची यादीच नेत आहेत. निवडणुकांपूर्वी स्थानिक नगरसेवक व इच्छुक लोकप्रतिनधी शहरांमध्ये सढळ हस्ते पैसा खर्च करत असतात. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून निवडणुका कधीही होतील हीच शक्यता असल्याने सोसायट्यांनी आपल्या मागण्या थांबवलेल्या नाहीत. आपल्या सोसायट्यांची टाकी साफ करणे, गेट बसवणे, सोसायट्यांच्या पूजांना वर्गणी मागणे, टँकरद्वारे पाणी टाकून घेणे असले प्रकार शहरात होत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question arises if the second term of election wasted former corporators and aspirants sud 02