डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडक्यांवर सकाळच्या वेळेत पाच ते सहा तिकीट खिडक्या असूनही सकाळच्या वेळेत एकच तिकीट खिडकी सुरू ठेवली जाते. या कालावधीत स्वयंचलित तिकीट प्रणालीतून तिकीट विकणारे खासगी विक्रेते अनुपस्थित असल्याने प्रवाशांंना एकाच तिकीट खिडकीसमोर उभे राहून तिकीट खरेदी करावे लागते.
पहाटेच्या वेळेत अनेक नागरिक प्रवास करतात. आता सुट्ट्यांचा हंगाम सुरू होईल. या कालावधीत अनेक नागरिक पहाटेच्या प्रवासाला पसंती देतात. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात पहाटेच्या वेळेत तिकीट खरेदीसाठी आले की त्यांना एकच रेल्वे तिकीट खिडकी उघडी असल्याचे दिसते. या खिडकीशिवाय अन्यत्र तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने प्रवासी रांगेत उभे राहून तिकीट खरेदी करतात.
हेही वाचा – राममंदिर अक्षत कलश यात्रेनंतर ठाण्यातील ८ लाख घरांत संपर्क साधणार
सकाळी सात वाजल्यानंतर मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सर्व तिकीट खिडक्या उघडल्या जातात. स्वयंचलित तिकीट प्रणालीजवळ खासगी विक्रेते बसून तिकीट विक्री करतात. त्यामुळे विनारांग लावता प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होतात. रेल्वेने पहाटेच्या वेळेत रेल्वे तिकीट घरातील किमान दोन तिकीट खिडक्या उघडी ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.