जिल्ह्यातील महामार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा परिणाम अंतर्गत वाहतूकीवरही होऊ लागला असून या कोंडीमध्ये बस आणि रिक्षा अडकून पडत आहेत. यामुळे थांब्यांवर पुरेशा बसगाड्या आणि रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या आणि सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना बसत आहे. या प्रवाशांच्या रिक्षा आणि बस थांब्यांवर लांब रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते. तसेच आसपासच्या शहरातून ठाणे शहरात दररोज कामासाठी येणाऱ्यांना सकाळच्या वेळेत ठाणे स्थानक परिसरात रिक्षा आणि बसगाड्या उपलब्ध होत नसून त्यांना थांब्यावरील रांगेत ताटकळत उभे रहावे लागत असल्याचे चित्र दिसून येते.

ठाणे जिल्ह्यातील महामार्गांवर गेल्या काही दिवसांपासुन सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत बस आणि रिक्षाही अडकून पडत आहेत. तसेच अनेक रिक्षा चालक वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागू नये म्हणून सकाळच्या वेळेत रिक्षा बाहेर काढणे टाळत आहेत. त्यामुळे रिक्षा थांब्यांवर पुरेशा रिक्षा उपलब्ध होत नाहीत. तसेच बसगाड्याही उपलब्ध होत नाही. सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी नोकरदार वर्ग ठाणे स्थानकापर्यंत रिक्षा आणि बसने प्रवास करतो. परंतु या वेळेत रिक्षा उपलब्ध होत नसल्याने शहरातील विविध थांब्यांवर रिक्षा आणि बसगाड्यांसाठी रांगा दिसून येतात. त्याचबरोर इतर शहरातील अनेक नागरिक कामासाठी ठाणे शहरात येतात. हे नागरिक स्थानकापर्यंत रेल्वे आणि त्यानंतर रिक्षा किंवा बसने कार्यालयापर्यंतचा प्रवास करतात. वाहतूक कोंडीत बस आणि रिक्षा अडकून पडत असल्याने त्यांना सकाळच्या वेळेत पुरेशा बस आणि रिक्षा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सॅटीस पूलावरील बसथांब्यावर आणि पुलाखाली रिक्षा थांब्यावर प्रवाशांच्या लांब रांगा लागत आहेत. वाहने वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांना कामावर जाण्यासाठी दररोज उशीर होत आहे.

Photos : ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा फटका ; रिक्षा आणि बससाठी लागताय रांगा

मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पूलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता ठाणेकरांसह मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतून रेल्वे मार्गाने ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांनाही कोंडीचा फटका बसण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. ठाणे स्थानक परिसरातील सॅटीस पूलाखाली असलेल्या रिक्षा थांब्यावर दररोज प्रवाशांच्या रांगा लागत आहे. यामुळे प्रवाशांचे २० ते २५ मिनीटे वाया जात आहेत. घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या टीएमटीच्या बसगाड्यांच्या थांब्यांवर प्रवाशांच्या रांगामध्ये वाढ होत आहे.

वाहतूक कोंडीमुळे वेळ आणि इंधन वाया जाते. याशिवाय मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे मी सकाळच्या वेळेत रिक्षा चालविणे टाळतो. – गोविंदकुमार जैस्वाल, रिक्षा चालक.

दररोज रिक्षा थांब्यावर २० ते २५ मिनीटे वाट पाहिल्यानंतर रिक्षा मिळते. अनेकदा रिक्षा चालक वाहतूक कोंडीमुळे घोडबदंर भागातील भाडे घेणेही टाळत असतात. – गणेश तिठे, प्रवासी.