ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा भागात बुधवारी रात्री एका मोटारीने अचानक पेट घेतला. त्यामुळे पातपीलापाडा ते कोपरी रेल्वे पूलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून घोडबंदर, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले. अवघ्या १५ मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना पाऊण ते एक तास लागत होता.
घोडबंदरच्या दिशेने वाहतुक करणारी मोटार पातलीपाडा चौकाजवळ आली असता, मोटारीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य पथकांकडून सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे पातलीपाडा ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे पूलापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. मुंबईहून रात्री हजारो नोकरदार त्यांच्या खासगी वाहनाने ठाणे, घोडबंदर आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करत असतात. वाहतुक कोंडीमुळे वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी सुमारे पाऊण तास लागत होता.