कल्याण– लोकल वाहतूक अनियमित वेळेत असल्याने कर्जत, शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ परिसरातील नोकरदारांनी सोमवारी सकाळी कामाच्या ठिकाणी दुचाकी, खासगी मोटारीने जाण्याचे ठरविले. त्यामुळे नेहमीच्या वाहतुकीत अचानक ही खासगी वाहने अधिक संख्येने धावू लागली. त्यामुळे दुर्गाडीपूल, नेवाळी नाका, शिळफाटा रस्ता, पत्रीपूल भागात सोमवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर, अंबरनाथ, कर्जत परिसरातून येणारी वाहने काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्याने काटई चौकातून शिळफाटा चौकाकडे जात होती. त्याचवेळी भिवंडी,कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरकडून येणारी वाहने टाटा नाका, मानपाडा चौकातून शिळफाटा दिशेने येत होती. भिवंडी, कल्याण परिसरातून येणारी वाहने दुर्गाडी पूल, पत्रीपूल भागात एकावेळी आल्याने या वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळच्या वेळेत कोंडी झाली होती.

हेही वाचा – ठाणे : मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत, लोकल गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने

सकाळीच वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहन चालक आपले वाहन पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील होते. दुचाकीस्वार यात आघाडीवर होते. मुसळधार पाऊस सुरू होण्याच्या आत कार्यालयात पोहोचू या विचारात असलेले वाहन चालक सर्वाधिक वाहन कोंडी रस्त्यावर करत होते. काटई नाका येथे बदलापूरकडून येणारी वाहने शिळफाटा दिशेने जाताना आणि शिळफाटाकडून बदलापूरकडे जाणारी वाहने काटई नाका येथे वळण घेत असताना सर्वाधिक वाहन कोंडी झाली होती. या वाहन कोंडीची माहिती समजल्यावर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या कोंडीचा सर्वाधिक फटका २७ गावांमधून डोंबिवली, पलावा वसाहतीत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, पालकांना बसला. अनेक पालकांंनी शाळेची वेळ निघून गेल्याने अर्ध्या रस्त्याने मुलांना घेऊन घरी येणे पसंत केले. अर्धा ते पाऊण तास वाहने जागीच खोळंबून राहत होती.

हेही वाचा – ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले, दोन वर्षांचा मुलगा जखमी

शिळफाटा रस्त्याच्या काही भागात गावांमध्ये, पेट्रोल पंपावर वळण घेण्यासाठी दुभाजकांमध्ये पाच फुटाचे रस्ते ठेवण्यात आले आहेत. या रस्त्यांवर वळण घेणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने कोंडीत आणखी भर पडली होती. कल्याण, डोंबिवली, दिवा भागातून मुंबईत गृहसेविका म्हणून जाणाऱ्या महिलांचे यात हाल झाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Queues of vehicles on kalyan shilphata road traffic congestion due to simultaneous entry of vehicles on the road ssb
Show comments