डोंबिवली- डोंबिवली पूर्व भागातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा शांत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकनगर भागात शहराच्या विविध भागातील रहिवासी, व्यापारी संकुलातील व्यावसायिक, डाॅक्टर, रुग्णवाहिका रस्त्यावर आणून ठेवत असल्याने स्थानिक रहिवासी हैराण आहेत. स्थानिक रहिवाशांना आपली वाहने कोठे उभी करायची असे प्रश्न पडू लागले आहेत.
टिळकनगर परिसरातील रस्त्यांवर अनेक व्यापारी संकुले आहेत. या संकुलांमध्ये वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ नाहीत. या संकुलांमधील व्यावसायिक, व्यापारी, डाॅक्टर आपली वाहने टिळकनगर मधील प्रशस्त मोकळ्या रस्त्यांच्या दुतर्फा आणून उभी करत आहेत. स्थानिक रहिवाशांना आपली वाहने कोठे उभी करायची असे प्रश्न पडून लागले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोटार कार उभ्या करण्यात येत असल्याने या भागातून अवजड ट्रक, अग्निशमन दलाचे वाहन, मोठी रुग्णवाहिका चालविण्यासाठी चालकाला कसरत करावी लागते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
टिळकनगर शाळेच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. विद्यार्थ्यांना शाळेत सोडणे, घरी नेण्यासाठी रिक्षा, खासगी वाहन चालक शाळेच्या प्रवेशव्दारावर उभे असतात. त्यांना रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहने उभी करण्यासाठी जागा राहत नाही. अनेक वेळा शाळा सुटताना, भरताना अवजड वाहन शाळेसमोरून जात असेल तर वाहतूक कोंडी या भागात होते, अशा तक्रारी पालकांनी केल्या.
बहुतांशी प्रभागात नगरसेवक रस्ते तयार करताना रस्त्याच्या कडेचे पदपथ ठेकेदाराला पदपथ काढून टाकण्यास सांगतात. वाहनांना येजा करण्यासाठी प्रशस्त रस्ता असा यामागे उद्देश असतो. अलीकडे या सुविधेचा लाभ व्यापारी, व्यावसायिक घेऊन आपली वाहने या प्रशस्त मोकळ्या रस्त्यांवर आणून उभे करत आहेत मानपाडा रस्त्यावरील, टिळकनगर रस्त्यांवरील व्यापारी संकुलांमधील व्यावसायिक, रुग्णालयांच्या रुग्णवाहिका टिळकनगर मधील रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात येत आहेत. एकावेळी सात ते आठ रुग्णवाहिका एकाच रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने चालक, प्रवासी हैराण आहेत.
मानपाडा रस्त्यावरील कोंडीतून सुटका करुन घेण्यासाठी अनेक वाहन चालक गोग्रासवाडी, साई बाबा मंदिर गल्लीतून टिळकनगरमधून इच्छित स्थळी जातात. या वाहन वर्दळीमुळे टिळकनगर मधील वाहनांचा भार वाढला आहे.
ठाकुर्ली पुलाखालील वाहनतळ दुर्लक्षित
अशीच परिस्थितीत सावरकर रस्ता, आगरकर रस्ता, रामनगर, राजाजी पथावर पाहण्यास मिळते. शहरातील अनेक जुन्या, काही नव्या इमारतींना वाहनतळ सुविधा नाही. अशा इमारतींमध्ये प्रत्येक घरात मोटार आल्याने ही सर्व वाहने रस्त्यावर उभी केली जातात. जागा नसली की इतर भागात सुरक्षित ठिकाणी वाहने उभी केली जातात.
स. वा. जोशी शाळे जवळील ठाकुर्ली उड्डाण पूल ते ठाकुर्ली रेल्वे फाटका दरम्यान उड्डाण पुलाखाली १७ गाळ्यांच्या मध्ये ६० ते ७० मोटारी, दुचाकी उभ्या राहतील अशी प्रशस्त जागा आहे. या जागेत परिसरातील रहिवासी आपली चारचाकी, दुचाकी वाहने सुरक्षितपणे या ठिकाणी उभी करून ठेवत आहेत. या जागेचा सर्व्हे करुन पालिकेने याठिकाणी पैसे द्या वाहने उभी करा असे वाहनतळ सुरू केले तर पालिकेला महसूल मिळू शकतो. याविषयी सर्व्हे करुन निर्णय घेतला जाईल, असे उत्तर डोंबिवली विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांनी दिले होते. पुढे याविषयी कोणतीही हालचाल झाली नाही. मालमत्ता विभागाला हा विषय कळविण्यात आल होता.