१८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी
अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर बलात्कार करणारा विकृत सीरियल रेपिस्ट रेहमत कुरेशी याचा ताबा नवी मुंबई पोलिसांकडून तुळींज पोलिसांनी घेतला आहे. नालासोपाऱ्यात त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मीरा रोड येथे राहणाऱ्या रेहमत कुरेशी या विकृत आरोपीने गेल्या काही वर्षांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि नालासोपाऱ्यातील अनेक अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले होते. त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. तो एकदाही पकडला गेला नसल्याने पालक आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण होते. कुरेशी अल्पवयीन मुलींना विविध कारणे सांगून घेऊन जायचा आणि शहरातील निर्जन स्थळी नेऊन बलात्कार करायचा. त्याने नवी मुंबई, ऐरोली, ठाणे आणि मुंबई येथेही अशाच प्रकारे अनेक अल्पवयीन मुलींना आपले सावज बनवले होते. २०१६ पासून पोलीस आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती; पण तो हाती लागत नव्हता. त्याने आता नालासोपाऱ्यात आपला मोर्चा वळवला होता आणि इकडच्या मुलींना सावज बनवायला सुरुवात केली होती. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत बलात्काराचे १५ गुन्हे दाखल होते.
तुळींज पोलिसांनी त्याचा माग काढल्यानंतर तो मीरा रोड येथे राहत असल्याचे आढळून आले होते. नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याचा ताबा मंगळवारी तुळींज पोलिसांनी घेतला. कुरेशीला दुपारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्याला १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
आरोपी रेहमत कुरेशी याच्याविरोधात आमच्या पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. संखेश्वरनगर येथील बलात्काराच्या प्रकरणात त्याला १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, असे नालासोपारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.