ठाणे : शहरात २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘रेबीजमुक्त ठाणे’ अभियान राबवण्यात आले. या अभियाना अंतर्गत शहरातील ११ हजार ५८२ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. ठाणे महापालिका आणि मिशन रेबीज यांच्या संयुक्त विद्यामाने हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात अनेक पशुप्रेमी संघटनांचाही समावेश होता. मागील काही वर्षात भटक्या श्वानांच्या संख्येत वाढ झाली आहे.
सर्व शहरांमध्ये भटक्या श्वानांचे वाढते प्रमाण तसेच भटक्या श्वानांनी घेतलेल्या चाव्यामुळे होणारी रेबीजची लागण लक्षात घेऊन ठाणे महापालिका आणि मिशन रेबीज यांच्या वतीने रेबीजमुक्त ठाणे अभियान राबवण्यात आले. रेबीजच्या लागण झालेल्या श्वानाच्या चाव्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण २०३० पर्यंत शुन्यावर यावे यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत विविध अभियान राबवून त्यामध्ये भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण केले जात आहे. मागीलवर्षी देखिल ठाणे महापालिकेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये ५ हजार श्वानांना लस देण्याची योजना आखण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्षात ७ हजार ४०९ भटक्या श्वानांचे रेबीजचे लसीकरण पार पडले. यंदाही ठाणे पालिका आणि विविध पशूप्रेमी संघटनांच्या सहाय्याने हे अभियान पुर्ण झाले. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबविला गेला. या अभियानाच्या माध्यमातून विभागाप्रमाणे शहरातील ११ हजार ५८२ भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण यशस्वीरित्या झाले.
तारीख | लसीकरण झालेली श्वानांची संख्या |
२९ जानेवारी | ९२१ |
३० जानेवारी | १७१३ |
३१ जानेवारी | १९३८ |
१ फेब्रुवारी | १८७१ |
२ फेब्रुवारी | १८७२ |
३ फेब्रुवारी | १६५९ |
४ फेब्रुवारी | १२५५ |
४ फेब्रुवारी – १२५५
ठाणे शहरात सुमारे ६० हजार भटके श्वान आहेत. यातील सात हजार श्वानांचे मागच्या वर्षी रेबीज लसीकरण पार पडले. त्याचबरोबर यंदा ११ हजार ५८२ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत लसीकरण करण्यासाठी २५ पथकांची नेमणुक करण्यात आली होती. प्रत्येक पथकात एक डाॅक्टर सह तीन कर्मचाऱ्यांची समावेश होता. शहरातील नागरिक तसेच प्राणी मित्रांकडून श्वानांची विभागवार माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार शहरातील ११ हजार ५८२ श्वानांचे रेबीज लसीकरण झाले असल्याचे, ठाणे महापालिकेच्या पशु वैद्यकीय अधिकारी डाॅ. क्षमा शिरोडकर यांनी सांगितले.