कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी रेबीज प्रतिबंधित लस संपल्याने कुळगाव बदलापूर पालिकेच्या रुग्णालयात सध्या रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांच्या महागडय़ा उपचाराकडे वळावे लागते आहे.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीजची लस देण्यात येते. शासनाने याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वेही दिली आहेत. त्यामुळे अशा लसींचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालयांमध्ये असणे अत्यावश्यक असते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या रुग्णालयात या लसींचा साठाच संपल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी बदलापूर पूर्वेतील शिवाजी चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याने सर्वानी सर्वप्रथम पालिका रुग्णालयाकडे धाव घेतली. यावेळी लस उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, बदलापूर शहराबाहेर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात पर्यायी लस उपलब्ध असतात. मात्र अनेकदा खबरदारीचा उपाय म्हणून रुग्ण लांब जाण्यापेक्षा खासगी रुग्णालयात जाण्याचा मार्ग पत्करतात. त्यामुळे त्यांना महागडय़ा उपचारांना सामोरे जावे लागते. यावेळी या खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णांची मोठय़ा प्रमाणावर लूट केली जाते. सध्या बदलापूर शहरात दररोज दोन ते तीन कुत्रा चावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेबीज प्रतिबंधात्मक लस लवकरारत लवकर उपलब्ध कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबत कुळगाव बदलापूर पालिकेचे डॉ. राजेश अंकुश यांच्याशी संपर्क केला असता, गेल्या पंधरा दिवसांपासून रेबीज प्रतिबंधात्मक लसींचा साठा संपला असून तो लवकरात लवकर आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्वानदंशाच्या घटना वाढल्या
तसेच ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता, आमच्याकडे रेबीज लसींचा पुरेसा साठा असून गेल्या काही दिवसांत आमच्याकडे रेबीज प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. दर महिना साधारणत: १२०-१५० रुग्ण येत असतात, मात्र या महिनाभरात आतापर्यंत ही संख्या २६४ पर्यंत पोहोचली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.