अवधूत गुप्ते यांच्याकरवी उद्घाटन घडवून आणण्याचे प्रयत्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहात सुरू करण्यात येणाऱ्या रेडिओ स्टेशन शुभारंभ सोहळ्यास अमिताभ बच्चन ते आमिर खानपर्यंत दिग्गज कलाकारांची उपस्थिती असावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या कारागृह व्यवस्थापनाच्या पदरी अखेर निराशा पडली आहे. बॉलीवूड कलाकारांच्या तारखा मिळत नसल्याने कारागृह प्रशासनाने आता या रेडिओ स्टेशनचे उद्घाटन मराठी कलाकाराकडून करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी नामांकित गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांना साकडे घालण्यात आले आहे.

ठाणे तुरुंगातील कैद्यांच्या मनोरंजनाबरोबर त्यांना उपयुक्त माहितीचे ज्ञान व्हावे या उद्देशाने तयार करण्यात आलेले तुरुंगातील एफएम रेडिओ केंद्र शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. या रेडियो स्टेशनचा शुभारंभ ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते व्हावा यासाठी तत्कालीन कारागृह अधीक्षक भलतेच आग्रही होते. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नही सुरु होते. मात्र याच काळात हे कारगृह अधिक्षक वादात सापडले आणि ठाणे कारागृहात अमिताभ आगमनाचे स्वप्नही बंदीस्त झाले. अमिताभ येत नाहीत हे लक्षात आल्याने कारागृहाच्या नव्या अधिक्षकांनी अमिर खान यांना शुभारंभ सोहळ्यासाठी साकडे घातले. परंतु, आमीर खानने वेळेअभावी येण्यास नकार दिला. आमीरची पत्नी किरण राव हिच्या हस्ते रेडिओचा शुभारंभ करण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला.

नव्या वर्षांत रेडीओ स्टेशन सुरु करायचे, असा निर्धार करून कारागृह प्रशासनाने आता मराठी कलाकारांकडे मोर्चा वळवला आहे.  या शुभारंभ सोहळ्यास अवधूत गुप्ते यांना विनंती करणार आहोत, अशी माहिती ठाणे मध्यवर्ती कारागृह अधिक्षक नितीन वायचळ यांनी दिली.

सहा महिन्यांपासून बंद

* गेल्या दोन वर्षांपासून अशा रेडिओ स्टेशनची सुरुवात वेगवेगळ्या तुरुंगात झाली असून ठाण्यातही हे केंद्र तयार आहे.

* खासगी एफएम रेडिओ केंद्राच्या मदतीने हे केंद्र तयार झाले असून त्यामध्ये कैदीच रेडिओ जॉकी म्हणून काम करणार आहेत.

* तुरुंगामध्ये रेडिओ स्टुडिओसाठी स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे.

* स्टुडिओच्या वायरिंगचे काम पूर्ण झाले असून सगळी कामे पूर्णत्वास गेली असली तरी उद्घाटन झाले नसल्यामुळे  सहा महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे.