डोंबिवली- येथील पश्चिमेतील गणेशनगर भागातील रागाई मंदिर, आशीर्वाद बंगल्या जवळील काही भागात रस्त्याच्याकडेला गटारे नाहीत. या भागातील काही रस्त्यांवर अरुंद जुना नाला आहे. वाढत्या वस्तीमुळे त्याची रुंदी पालिकेकडून वाढविण्यात येत नाही. हा नाला गाळ, कचऱ्याने भरला असल्याने थोड्याशा पावसातही रागाई मंदिर परिसरातील रस्ते जलमय, घरांमध्ये पाणी घुसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी पहाटेपासून पडत असलेल्या पावसांच्या सरींनी गणेशनगर परिसरात पाणी तुंबले. तुंबलेले पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने हे पाणी लगतच्या घरात शिरले. रागाई मंदिर परिसरात गटारांची नव्याने बांधणी करा, जुना नाला रुंद करा म्हणून या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे मागील चार महिन्यांपासून पालिकेचा बांधकाम, मलनिस्सारण विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. त्याची दखल घेतली जात नाही.या कामाची नस्ती मुख्यालयाकडे पाठविली आहे. मंजुरीनंतर हे काम हाती घेतले जाईल. आता पावसाळा सुरू झाल्याने हे काम आता हाती घेणे शक्य होणार नाही, असे उत्तर अभियंते देत आहेत.शहरात कोणत्या भागात गटारे नाहीत. तेथील पाण्याची निचरा करण्याची जबाबदारी शहर अभियंता विभागाची आहे. आताचे शहर अभियंता याबाबत उदासीन असल्याची टीका तक्रारदार म्हात्रे यांनी केली.

हेही वाचा >>>डोंबिवली जीमखान्या जवळील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात अंधार

गणेशनगर मधील पेट्रोल पंप, रागाई मंदिरा जवळील रस्ता काही ठिकाणी रुंद काही ठिकाणी अरुंद गल्लीबोळातून आहे. या भागातील काही रस्त्यांच्या कडेला गटारे नाहीत. पावसात या भागातील पाणी रस्त्यांवरील खाचखळगे आणि परिसरात वाहून जाते आणि काही अडून राहते. हे पाणी वाहून जाण्यासाठी एक छोटा नाला बांधून ते पाणी आडबाजुला असलेल्या जुन्या छोट्या नाल्यात सोडण्यात आले आहे. जुना नाला अरुंद गटार, गाळाने भरलेला आहे. रस्त्यावरील पाणी, दुसऱ्या भागातून आणून सोडलेले पाणी वाहून नेण्याची क्षमता जुन्या नाल्यात नाही. जुन्या नाल्यातील पाणी पावसाचे प्रमाण वाढले की ते पाणी रस्त्यावर वाहून येते, असे म्हात्रे यांनी सांगितले.पाणी तुंबण्याचा फटका सरस्वती सदन, आशीर्वाद बंगला, स्वप्नरेखा, लक्ष्मी निवास, मोती कृपा, रागाई मंदिर परिसराला बसत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर या भागात नागरिकांच्या घरात पाणी गेले, तुंबलेल्या पाण्याचा विद्यार्थी, लहान मुले, पालकांना त्रास झाला तर परिसरातील रहिवाशांना घेऊन तुंबलेल्या पाण्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी दिला आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी आज गुंतवणुकीचे दिशादर्शन

भावे सभागृहा जवळील गणेशनगर रेल्वे मैदाना जवळील सोसायट्या भागात गटारांचे नियोजन नसल्याने ठाकुर्ली उड्डाण पुलाकडून येणारे पाणी या भागातील सोसायट्यांमध्ये घुसते. यापूर्वी हे काम करण्याचा प्रयत्न आपण केला होता, एका लोकप्रतिनिधीने त्यात आडकाठी आणली होती, असे म्हात्रे यांनी सांगितले.

“गणेशनगर रागाई मंदिर परिसरात काही ठिकाणी गटारे नाहीत. पावसाचे पाणी रस्त्यांवर तुंबते. हे पाणी बाजुच्या अरुंद नाल्यात सोडण्याचा प्रयत्न पालिकेने केलेला प्रयत्न फसला आहे. रहिवाशांना तुंबलेल्या पाण्याचा त्रास होणार आहे. त्यासाठी आपण आंदोलन करणार आहोत.”-प्रल्हाद म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ragai temple complex in dombivli under water due to narrow drain and lack of drains dombiwali amy
Show comments