ठाणे : देशातील सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांमार्फत दबाब टाकून भाजपने कंपन्यांकडून निवडणूक रोखेच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे. निवडणूक रोखे ही कल्पनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करते करविते आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच आमचे सरकार आल्यावर आम्ही याबाबत कडक कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज, शुक्रवारी भिवंडीत दाखल झाली. त्यांनी शहरात ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना संबोधित केले. यानंतर त्यांची यात्रा रात्रीचा मुक्काम असलेल्या भिवंडीतील सोनाळे गावात पोहोचली. येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात निवडणूक रोखे ही योजना आणली होती. या योजनेचे सत्य आता जनतेला कळले असून या योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाला आहे. जगातील हा सर्वात एक मोठा घोटाळा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

हेही वाचा – माढ्यात मोहिते-पाटील शांत; मात्र समर्थक आक्रमक; ‘तुतारी’ वाजू लागली

ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणाकडून कंपन्याना कारवाईचे भय दाखविले जाते आणि त्यांच्यावर दबाब टाकला जातो. यानंतर त्या कंपन्याकडून निवडणूक रोखे स्वरूपात भाजप खंडणी उखळते. याचे उदाहरण म्हणजे शेल कंपनी आहे. तसेच बांधकाम तसेच इतर अशी मोठी कंत्राटे ज्या कंपन्याना देण्यात आली, त्यांच्याकडूनही निवडणूक रोखे स्वरूपात हफ्ते घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. निवडणूक रोखे हा भ्रष्टाचार म्हणजे देशविरोधी कृत्य आहे. भाजपचे सरकार कधी न कधी जाईल आणि आमचे सरकार सत्तेवर येईल. त्यावेळी या घोटाळ्याची चौकशी करून अशी कारवाई करू की यापुढे असे करायची कुणाची हिंमत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

ईडी आणि सीबीआय या तपास यंत्रणा आता देशाच्या राहिलेल्या नाहीत. या यंत्रणा आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करीत आहेत. या यंत्रणांनी त्यांचे काम केले असते तर निवडणूक रोखे घोटाळा झालाच नसता. निवडणूक रोखे ही कल्पनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली असून यामुळे तेच या खंडणी प्रकरणाचे करते करविते आहेत, असा आरोप करत यामध्ये नितीन गडकरी यांचा काहीच संबंध नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

हेही वाचा – भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेले नाराजीनाट्य चार दिवसांत संपेल, गिरीश महाजन यांचा दावा

निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपने पैसे कमविले आणि याच पैशातून त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षात फूट पडली. तसेच पैसे आणि तपास यंत्रणाकडून दबाब टाकून भाजपने महाराष्ट्रातील सरकार पाडले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने भिवंडी शहरातील रस्त्यांवर जागोजागी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक आणि पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. तसेच यात्रेच्या स्वागतासाठी चौकाचौकात कार्यकर्त्यांचे जथे जमले होते. यामुळे यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केल्याचे चित्र दिसून आले. देशात सरकार आल्यावर जातनिहाय गणना आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi yatra bhiwandi extortion racket through investigative system in the country rahul gandhi accuses the pm ssb
Show comments