कल्याण शीळफाटा श्री मलंग रस्त्यावरील नांदिवली येथील सनसिटी, सोनारपाडा येथील इंद्रप्रस्थ बारवर छापा टाकून पोलिसांनी ८४ जणांना अटक केली.
बाहेरून बीयर बार असल्याचा देखावा करून आत रात्री उशिरापर्यंत डान्सबार चालवयाचे अशी शक्कल मालकांनी लढवली आहे. याला स्थानिक पोलिसांचीही साथ असल्याने बारमालकांची चंगळ होती.
सोनारपाडा येथील इंद्रप्रस्थ बारविरोधात लोकांच्या अनेक तक्रारी होत्या. येथे कानठळ्या बसवणारा आवाज रात्री उशिरापर्यंत असतो. महिलांची ये-जा सुरू असते. अशा तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. साहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांनी रात्री इंद्रप्रस्थ बारवर छापा टाकला. तेथे काही महिला बीभत्स, अश्लील हावभाव करीत नाचगाणी करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी बारला चारही बाजूने घेरले. या ठिकाणाहून रजत शेट्टी, सुरेंद्र शेट्टी, प्रदीप काळे, उमेश शेट्टी या बार चालकांसह १७ महिला नृत्यांगनांना अटक केली. १ लाखाचा ऐवज, ध्वनिक्षेपणाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
अजित साळवी यांच्या तक्रारीवरून २४ जणांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच कारवाई कोळसेवाडी पोलिसांनी सनसिटी बारवर केली आहे. तेथून २० नृत्यांगना, २३ ग्राहकांना अटक केली.

Story img Loader