अंबरनाथ: अंबरनाथहुन सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या लोकलमध्ये यार्डात प्रवेश करू न दिल्याने मंगळवारी रेल्वे प्रवाशांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकात रेल रोको केला. सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकल वेळी हा प्रकार झाला. रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रवाशांना हटवत लोकल फलाटावर मार्गस्थ केली. मात्र त्यामुळे लोकलला १० मिनिट उशीर झाला. याप्रकरणी प्रवाशांवर कारवाई करण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून सकाळच्या वेळी अनेक लोकल सोडल्या जातात. यातील काही लोकल अंबरनाथ येथील रेल्वे यार्डात उभ्या असतात. अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकल मध्ये शिरून जागा पकडतात. त्यांनतर लोकल फलाटावर येते. मंगळवारी नेहमीप्रमाणे काही प्रवासी लोकलमध्ये जागा मिळवण्यासाठी यार्डात पोहोचले. काही प्रवाशांनी लोकलमध्ये जागा मिळवली होती. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना लोकलमधून उतरून फलाटावर जाऊन लोकल पकडण्याचे सुचवले. यातील अनेक प्रवाशांनी सुरुवातील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विरोध केला. त्यानंतर काही प्रवासी संतप्त झाले. त्यांनी लोकल फलाट क्रमांक दोनला लागण्यापूर्वीच लोकल रोखून धरली. यामुळे रेल्वे रुळांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यात सुमारे दहा मिनिटे गेल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रवाशांना बाजूला काढत लोकल फलाटावर मार्गस्थ केली. मात्र या दरम्यान लोकलला दहा मिनिटे उशीर झाला. या प्रकारानंतर रेल्वे प्रशासनाच्या विरुद्ध प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची मनमानी, प्रवाशांना रिक्षेतून उतरवण्याचे प्रकार
प्रवाशांच्या तक्रारीवरूनच कारवाई
काही महिला प्रवाशांनी यार्डातून लोकल मध्ये बसून येणाऱ्या प्रवाशांमुळे जागा मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. उद्यापासून ही कारवाई नियमितपणे केली जाईल असेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.