|| आशीष धनगर

दिव्यात उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी भूखंड सर्वेक्षण सुरू 

रेल्वे प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी मंजुरी दिलेल्या दिवा पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकाम भूसर्वेक्षणाला अखेर सुरुवात झाली आहे. जून २०१८मध्ये या पुलासाठी रेल्वेतर्फे निविदा काढण्यात आली. तरीही प्रत्यक्ष काम सुरू होत नव्हते, मात्र आता लवकरच हे काम सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुलामुळे दिव्याचे फाटक हद्दपार होऊ शकणार आहे.

या उड्डाणपुलासाठी ६८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून काम पूर्ण होण्यास २४ महिने लागणार आहेत. मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिका हे काम करणार आहेत.  दिवा रेल्वे स्थानकातील फाटकाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना आजवर १५०हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघटनेने दिली. हे अपघात टाळण्यासाठी पूर्व पश्चिम भागाला जोडणारा रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी आठ वर्षांपासून जोर धरत होती. उड्डाणपुलाला २०१३ साली रेल्वे प्रशासनातर्फे मंजुरी देण्यात आली. मात्र पाच वर्षे निविदाच निघाली नव्हती. जून २०१८मध्ये निविदा काढण्यात आली. परंतु पुन्हा उड्डाणपुलाचे काम रखडले होते. अखेर या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून उड्डाणपुलाच्या भूसर्वेक्षणास सुरुवात झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फाटक बंद होऊन मध्य रेल्वेच्या गाडय़ाही वेळेवर धावण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिवा रेल्वे स्थानकातून कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने स्थानकात गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे दिवा स्थानकात अपघातांचेही प्रमाण वाढत असल्याचे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.

पादचारी पूल लवकरच खुला

दिवा रेल्वे स्थानकात कल्याण दिशेला बांधण्यात येणाऱ्या नव्या पादचारी पुलाचे काम चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. हे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. तसेच आणखी एक पादचारी पूल पूर्वेला जोडण्याचे काम सुरू आहे. हे दोन्ही पूल वर्षांखेपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने ‘लोकसत्ता’ला दिली.

दिवा रेल्वे स्थानकाजवळ नव्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सध्या भूसंपादन सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.    – ए. के. जैन, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

 

Story img Loader