जागेच्या भाडय़ापोटी बदलापूर पालिकेकडे ७.८६ कोटींची मागणी
शहरांमध्ये स्वच्छता नांदावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकीकडे विविध योजनांची आखणी केली जात असताना बदलापूर नगरपालिकेने शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन नीटनेटके व्हावे यासाठी आखलेल्या भुयारी गटार योजनेला रेल्वे प्रशासनानेच खोडा घातल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ही योजना ज्या भागातून आखण्यात आली आहे त्यापैकी काही जागा रेल्वेच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे नगरपालिकेने जागेचा वापरापोटी सुमारे सात कोटी रुपयांचे भाडे भरावे, अशी भूिमका रेल्वेने घेतली आहे. या योजनेचा जेवढा खर्च होत नाही तेवढा निधी भाडय़ापोटी भरावा लागणार असल्याने नगरपालिका प्रशासन आवाक झाले आहे.
बदलापूर शहरात भुयारी गटार योजना लवकरच कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी शोचखड्डे ही संकल्पना रद्द ठरविण्यात आली असून सांडपाणी वाहिनीच्या माध्यमातून थेट नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात नेले जाणार आहे. या योजनेसाठी २२६ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे.
नगरपालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाला आता रेल्वे प्रशासनाचा अडसर ठरू लागला आहे. या कामात रेल्वेच्या अखत्यारीत असलेली जागा आवश्यक आहे. काही नैसर्गिक नाले आणि जमिनीच्या उताराने तयार झालेले नाले रेल्वे रुळालगत आहेत. रेल्वेच्या रहिवाशी चाळींच्या सांडपाण्यासाठी रेल्वे हद्दीतून स्थानकाजवळून सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या टाकणे गरजेच्या आहेत. या कामांसाठी लागणाऱ्या जमिनी रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्याने रेल्वे प्रशासनातर्फे नगरपालिकेला तब्बल ७ कोटी ८६ लाख रुपये भाडे १० वर्षांसाठी मागण्यात आले आहे. यात रेल्वे स्थानकाजवळील जागेसाठी १ कोटी ७३ लाख तर कात्रप आणि बेलवलीतील पवार कॉम्पलेक्सच्या मागच्या नाल्यासाठी ६ कोटी १३ लाखांच्या भाडय़ाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जितका खर्च भुयारी गटार बांधण्यासाठी येणार नाही,त्यापेक्षा कितीतरी अधिक भाडे द्यायचे कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रेल्वेची पालिकाविरोधी कारवाई
रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नाल्यांच्या सफाईसाठी अनेकदा पालिका प्रशासनाला रेल्वेचे उंबरठे झिजवावे लागत असून पालिकेच्या नालेसफाईच्या कामात रेल्वेने अनेकदा हस्तक्षेप केला आहे. पालिकेचे पोकलेन आणि बुलडोजर तसेच इतर साहित्यही एकदा रेल्वेने जप्त केले होते.
रेल्वेचाही फायदाच
रेल्वेची वसाहत बदलापूर रेल्वे स्थानकाशेजारी आहे. त्याचेही सांडपाणी शहरातील नाल्यात जात असते. त्यामुळे त्या वसाहतींचे सांडपाणी आणि स्थानकातील सांडपाणीही जाण्यासाठी या भुयारी गटारीचा उपयोग होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिकेचा याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरूआहे. पहिल्या टप्प्यातील परवानगी तब्बल चार वर्षांनी मिळाली.त्यामुळे गरज भासल्यास स्थानिक रेल्वे अधिकार किंवा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशीही बैठक घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
वामन म्हात्रे, नगराध्यक्ष
सागर नरेकर