डोंबिवली : डोंंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर कोपर दिशेने (पश्चिम) उतरण्यासाठी एक उतार जिना होता. या जिन्यावरून इतर प्रवाशांबरोबर दिव्यांग प्रवाशांना आपली तीन चाकी सायकल घेऊन चढ, उतार करणे शक्य होत होते. डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्व, पश्चिम पादचारी पुलाच्या कामासाठी फलाट क्रमांक पाचवरील जिना प्रवाशांसाठी रेल्वेने बंद केला आहे.
हा जिना बंद करण्यात आल्याने प्रवाशांना आता पूर्व दिशेकडील जिन्याने चढ, उतार करावी लागत आहे. यापूर्वी पश्चिम दिशेच्या उतार जिन्यामुळे गर्दीचे विभाजन होऊन प्रवासी इच्छित डब्या जवळ जात होता. पश्चिम दिशेने उतरल्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारा महिला, पुरूष प्रवासी महिला डबा, प्रथम श्रेणी डबा आणि इतर सामान्य डब्यांजवळ जात होता. या जिन्याला फक्त उतार असल्याने आणि शिड्या नसल्याने प्रवासी धावत जाऊन लोकल पकडू शकत होता.
आता पश्चिम दिशेचा कोपर बाजुकडील फलाट क्रमांक पाचवरील जिना प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना पूर्व बाजूकडील जिन्यावरून फलाटावरून उतरून कोपर दिशेने जाऊन लोकल पकडण्यासाठी उभे राहावे लागते. फलाट क्रमांक पाचवर स्कायवाॅकचे आधारखांब, जिन्यांनामुळे निमुळती जागा आहे. या निमुळत्या जागेतून येजा करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, असे प्रवाशांनी सांगितले.
पश्चिम दिशेकडील जिन्याला उतार असल्याने दिव्यांग प्रवासी थेट आपल्या तीन चाकी सायकलने कोणाचीही मदत न घेता फलाट क्रमांक पाचवर उतरत होते. किंवा या जिन्यावरून स्कायवाॅकवर येऊ शकत होते. स्कायवाॅकवर येताना चढाव असल्याने दिव्यांग प्रवाशाला कोणाचाही तरी सायकल लोटण्यासाठी आधार घ्यावा लागत होता. आता हा उतार जिना बंद करण्यात आल्याने दिव्यांग प्रवाशांचे पुलाची उभारणी होईपर्यंत हाल होणार आहेत. मुंबईला जाणारा बहुतांशी प्रवासी या उतार जिन्याचा सर्वाधिक वापर करत होता.
रेल्वेने पुलाचे काम पावसाळयापूर्वी पूर्ण करावे. अन्यथा पावसाळ्यात प्रवाशांचे अतोनात हाल होईल, अशी भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी फलाटांवर खोदून ठेवण्यात आले आहे. काही भाग पत्रे ठोकून बंदिस्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासांना फलाटावर हालचाल करताना अडचणी येत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे. भविष्याचा विचार केला तर ही कामे प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. ही कामे रेल्वेने पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा. लता अरगडे अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.