ठाणे : नवीन ठाणे रेल्वे स्थानक परिचलन क्षेत्रातील काम रेल्वे करेल तर परिचलन क्षेत्राबाहेरील काम ठाणे स्मार्ट सिटी करेल, असा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे स्थानक उभारणी कामाला गती मिळणार असून त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी रुपये वाचणार आहेत.
हेही वाचा >>> पार्टीत दारू कमी पडली आणि २५ वर्षीय बर्थडे बॉयला मित्रांनीच संपवलं; २७ जूनच्या रात्री घडलं काय? पोलीस म्हणाले..
ठाणे मनोरूग्णालयाच्या जागेत बांधण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बुधवारी रेल भवन येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकल्पाविषयीची पार्श्वभूमी मांडत या प्रकल्पामुळे ठाणे शहराला कसा फायदा होणार आहे याची माहिती दिली. त्यानंतर खासदार डॅा. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी परिचलन क्षेत्रामध्ये जी कामे करण्यात येणार आहेत, ती सर्व कामे रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या निधीमधून करण्याची मागणी केली. ही मागणी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्य केली. रेल्वे परिचलन क्षेत्रामध्ये करण्यात येणारी कामे ही रेल्वे मंत्रालय त्यांच्या निधीतून करेल. या कामासाठी भविष्यात होणारी भाववाढ आणि त्या कामासाठी लागणारा अतिरिक्त निधीही रेल्वे मंत्रालय करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर परिचलन क्षेत्राच्या बाहेर ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम सोडून उर्वरित कामासाठी रेल्वेच्या ना हरकत घेण्याची तरतूदही रद्द करण्यात यावी, ही खासदारांची मागणी मंत्री वैष्णव यांनी मान्य केली.
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानकाबाहेरील प्रवासी सुविधेसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची उभारणी करण्याची कामे करण्यात येत आहेत. यात रस्ते, पुलाच्या उभारणीच्या कामांचा समावेश आहे. तसेच रेल्वे स्थानक उभारणीचे काम रेल्वे विभागामार्फत करण्यात येणार होते. या कामासाठी पालिका प्रशासन रेल्वे विभागाला पैसे देणार होती. परंतु रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाणे महापालिकेचे अंदाजे १८५ कोटी रुपये वाचणार आहेत. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे उपस्थित होते.
चौकट ठाणे येथे मनोरूग्णालयाच्या जागेत ठाणे स्मार्ट सिटीतंर्गत नवीन रेल्वे स्टेशन बांधण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे परिचलन क्षेत्रामधील ट्रॅक बांधणे, रेल्वे स्टेशन इमारत बांधकाम बांधणे आदी अनुषंगिक कामे आणि परिचलन क्षेत्राच्या बाहेरील डेक, रॅम्प आदी अनषंगिक कामे स्मार्ट सिटीच्यावतीने करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आता पालिका ऐवजी रेल्वे विभाग निधी खर्च करणार आहे.