रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध पावले उचलली जात असली तरी डोंबिवली स्थानकातील ‘अर्धवट’ प्लॅटफॉर्मची स्थिती तशीच आहे.
स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी शिरताच डाव्या बाजूला प्लॅटफॉर्म सुरू होतो, त्यानंतर अचानक पोकळी आणि नंतर पुन्हा प्लॅटफॉर्म सुरू होतो. प्रवाशांना याचा अंदाज आला नाही तर उतरताना अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अशा प्रकारे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ठाण्यापल्याडच्या स्थानकांची उंची वाढत असताना डोंबिवलीमधील ही जीवघेणी पोकळी मात्र कायम आहे. त्यामुळे डोंबिवली स्थानकातील हा खड्डा बुजवण्यासाठी एखाद्या अपघाताची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार नाही
* ठाण्यापाठोपाठ सर्वाधिक प्रवासी संख्या डोंबिवली स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची असून त्यांच्या सुरक्षेची पुरेशी जबाबदारी रेल्वे प्रशासन घेत नसल्याचे दिसून येत आहे.
* गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवण्याचे काम सुरू असून ते आजही पूर्ण झालेले नाही.
* प्लॅटफॉर्मवरील खड्डे, पोकळी यांकडे रेल्वेचे दुर्लक्ष झाले आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना या संदर्भात रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने साकडे घालण्यात आले होते. त्या वेळी धोकादायक खड्डे बुजवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र डोंबिवली स्थानकाचा विचार केला जात नाही याची खंत वाटते.
– लता अरगडे, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ

Story img Loader