१४ वर्षांपासून एकाही लांबपल्ल्याच्या नवीन गाडीला थांबा नाही, पालघरकरांची गैरसोय
ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून तयार करण्यात आलेला पालघर जिल्हा हे महत्त्वाचे स्थानक आहे. जिल्हा निर्मितीनंतर पालघरची लोकसंख्याही वाढत आहे. अनेक प्रांतातील, राज्यातील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत. परंतु गेल्या १४ वर्षांपासून पालघर रेल्वे स्थानकात एकाही नव्या लांबपल्ल्याच्या गाडीला थांबा देण्यात आलेला नाही. अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ा पालघरला ‘सायडिंग’साठी थांबवल्या जातात. पण एकाही गाडीला अद्याप अधिकृत थांबा दिलेला नाही.
अडीच वर्षांपूवी पालघर हे जिल्हा मुख्यालय म्हणून तयार करण्यात आले. सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांची मुख्यालये पालघर येथे आहेत. तसेच जिल्हा निर्मितीनंतर पालघरची लोकसंख्याही कमालीची वाढली आहे. पालघर एवढे महत्त्वाचे स्थानक असूनही मागील १४ वर्षांपासून एकही लांबपल्ल्याच्या नवीन गाडीला पालघर रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. मार्च २००३ मध्ये वांद्रे-जयपूर गाडीला पालघर स्थानकात थांबा मिळाला होता. हीच ती शेवटची गाडी होती. त्यानंतर एकाही नव्या गाडीला पालघर स्थानकात थांबा मिळालेला नाही. सध्या पालघर रेल्वे स्थानकात दहा लांबपल्ल्याच्या गाडय़ांना थांबा मिळतो. त्यात सौराष्ट्र जनता एक्स्प्रेस, वांद्रे-बिकानेर-रणकपूर, वांद्रे-जयपूर एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, सौराष्ट्र मेल, गुजरात मेल, डेहराडून एक्स्प्रेस, फिरोजपूर जनता एक्स्प्रेस, फ्लाईंग राणी सुपरफास्ट आणि लोकशक्ती या गाडय़ांचा समावेश आहे. २००३ नंतर अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या तसेच नवीन गाडय़ांची घोषणाही करण्यात आली. मात्र त्यांना पालघर स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही.
अ स्थानकाचा दर्जा द्या
२००३ नंतर अनेक गाडय़ा सुरू झाल्या. बंगळुरू-जोधपूर, म्हैसूर-अजमेर आदी गाडय़ांमध्ये पालघरचे सर्वाधिक प्रवासी असतात. परंतु त्यांना पालघरमध्ये थांबा दिला जात नाही. पालघर रेल्वे स्थानकाला अ स्थानकाचा दर्जा मिळावा अशी रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी आहे. मात्र त्याकडेही रेल्वेने दुर्लक्ष केले आहे.
फक्त ‘सायडिंग’साठी
पालघरमधील एक प्रवासी संकेत ठाकूर यांनी याबाबत गेल्या काही वर्षांपासून रेल्वेकडे पाठपुरावा सुरू केला आहे, मात्र रेल्वेने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. पालघरमध्ये कोकणातील, दक्षिण भारतातील, राजस्थान राज्यातून आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. त्यांना प्रवास करण्यासाठी असणाऱ्या गाडय़ांना पालघरमध्ये थांबा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. पालघरला थांबा मिळत नाही परंतु याच स्थानकात या गाडय़ा ‘सायडिंग’साठी उभ्या केलेल्या असतात. पुणे-इंदोर ही गाडी दररोज अर्धा तास पालघर रेल्वे स्थानतात ‘सायडिंग’ला उभी असते, पण तिला थांबा दिला जात नाही. याचप्रमाणे केरळ संपर्क क्रांती, कोचीवेलू डेहराडून, अमृतसर कोचीवेलू दररोज पंधरा ते वीस मिनिटं पालघरला ‘सायडिंग’ला उभ्या असतात. पालघर स्थानक हे या गाडय़ांसाठी ‘सायडिंग’ला काढण्याचे स्थानक बनले आहे. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.