कल्याण : प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन ठाणे ते कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या शटलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांची भेट घेऊन केली. याशिवाय रेल्वे प्रवाशांच्या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी कल्याण लोकसभेचे खासदार, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी आमदार मोरे यांच्याकडे रेल्वे प्रवासी संघाच्या पदाधिकऱ्यांनी केली.
कर्जत, कसारा भागातून ठाणे, मुंबई परिसरात नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. या भागातील प्रवासी ठाणे येथून रेल्वे नवी मुंबई, पनवेल भागात जातो. संध्याकाळच्या वेळेत सीएसएमटी, दादर येथून कल्याण, कर्जत, कसारा, खोपोली रेल्वे स्थानकाकडे सुटणाऱ्या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. या खचाखच भरलेल्या लोकलमुळे ठाणे रेल्वे स्थानकात या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या कर्जत, कसाराकडील प्रवाशांना गर्दीच्या लोंढ्यामुळे चढता येत नाही. प्रवाशांच्या या लोकल गेल्यातर त्यांना अर्धा ते पाऊण तास रखडावे लागते. त्यामुळे संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्थानकातून पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने कर्जत, कसारा, खोपोली, आसनगाव दिशेने शटल सेवा वाढवाव्यात. रेल्वे प्रवाशांच्या या मागणीच्या पूर्ततेसाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार देशमुख, ठाकुर्ली -कोपर रेल्वे प्रवासी संघटनेचे सागर घोणे यांंनी आमदार मोरे यांच्याकडे केली.
हे ही वाचा… भविष्यातील पाणथळ संवर्धनासाठी राष्ट्रीय परिषद; मुंबई विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग
डोंबिवली, कल्याण ही सर्वाधिक वर्दळीची रेल्वे स्थानके आहेत. या रेल्वे स्थानकातील विकास कामे आणि समस्यांविषयी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक बोलावून या रेल्वे स्थानकांमधील प्रवासी समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, मुंबई रेल्वे विकास मंडळाकडून सुरू असलेले विकास प्रकल्पांना गती मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा मागण्या आमदार मोरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा… ठाणे कारागृहातील बंद्याची करामत, सँडेलच्या सोलमध्ये लपवून आणला होता मोबाईल
डोंबिवली, कल्याण, ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मार्गी लावणे यासाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अधिकचे प्रयत्न केले जातील. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येईल. – राजेश मोरे, आमदार, कल्याण ग्रामीण
ठाणे ते कर्जत, कसारा दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या विचारात घेऊन आमदार राजेश मोरे यांची रेल्वे प्रवासी संंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन या समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ