खोपोली, कर्जत येथील पर्यटन स्थळ पाहण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करवा लागत आहे. पर्यटकांकडून रेल्वे डब्यात होणारा गोंधळ, अश्लील संभाषणे, धांगडधिंगा याबद्दल नियमित प्रवास करणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

खोपोली-कर्जत भाग हा निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो. येथील सोलनपाडा डॅम आणि आषाणे धबधब्यावर दिवसाला हजारो मुंबईकर पर्यटनासाठी येतात. मात्र, या पर्यटकांचा प्रवासही इतरांसाठी त्रासदायक ठरतो. मोठमोठय़ा गटांनी येणाऱ्या या पर्यटकांचा लोकल प्रवासादरम्यान धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना उभे राहायलाही नीट जागा मिळत नाही. त्यातच हे पर्यटक मोठमोठय़ा आवाजात गाणी म्हणणे, अश्लील संभाषण करणे असे प्रकार करत असतात. अनेकदा लोकलच्या डब्यातच मद्यप्राशन करण्यात येत असते. या साऱ्याचा सहप्रवाशांना मोठा त्रास होतो.

गेल्या दोन महिन्यांपासून कर्जत-खोपोली रेल्वेगाडी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. कर्जत येथून अनेकजण बदलापूर, उल्हासनगर, मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरीनिमित्त येत असतात. मात्र, सकाळी अकराच्या सुमारासही सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाडीतही गर्दी असल्याने या प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. ‘जून आणि जुलै महिन्यात या गर्दीला नेहमी सामोरे जावे लागते. मी नरिमन पॉईंट येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. मात्र, अनेकवेळा पर्यटकांमुळे डब्यात चढताना त्रास होतो. काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी एक ट्रक दारूच्या बाटल्यांचा खच काढला,’ असे आषाणे गावात राहणारे सुभाष ठाणगे यांनी सांगितले.

गटारीपर्यटन धोक्याचे!

ठाणे : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या श्रावण महिन्याच्या दोन दिवस आधी नागरिकांवर चढत असलेला ‘गटारी’ ज्वर आता टिपेला पोहोचला आहे. शनिवार, रविवार अशी दोन दिवसांची सुट्टी चालून आल्याने यंदा ठाणे, रायगड, वसई, पालघर परिसरातील धबधबे, नद्या, धरणे यांसारख्या नैसर्गिक पर्यटनस्थळांसोबत रिसॉर्टवर पर्यटकांची झुंबड उडण्याची चिन्हे आहेत. कर्जत, बदलापूर, पनवेल, शहापूर, खोपोली या परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी मद्यपाटर्य़ाचे प्रकार जास्त आहेत.  या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. पुढील दोन-तीन दिवस ठिकठिकाणी नाकाबंदी करून पर्यटकांची तपासणी करण्यात येणार आहे.

पर्यटकांकडून डब्यात नेहमीच आरडाओरडा सुरू असतो. त्याचा इतर प्रवाशांना त्रास होतो. अनेकवेळा पाण्यात भिजून आलेले पर्यटक तसेच डब्यात बसतात. त्यामुळे संपूर्ण डबा ओला होतो.

प्रभाकर गंगावणे, सचिव, कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन

Story img Loader