लोकलमध्ये चढताना, फलाटावरील प्रवाशांचे भुरट्या चोरांनी चोरलेले मोबाईल उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये विकले आहेत. तांत्रिक माहितीच्या आधारे कल्याण, ठाणे येथील लोहमार्ग पोलिसांच्या पथकांनी उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये जाऊन चोरीचे आठ लाख ५८ हजार रूपये किमतीचे ५२ मोबाईल जप्त केले आहेत.

प्रवाशाकडील मोबाईल चोरल्यानंतर त्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो. अनेक वेळा असे चोर दोन ते तीन वर्षांनी पोलिसांच्या हाती लागतात. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी चोरलेले मोबाईल कोणाला विकलेले असतात? त्यांची चोरीचे मोबाईल विकण्याची पद्धत काय आहे? मोबाईल दुकानदार असे मोबाईल खरेदी करतात का? सामान्य रहिवाशाने असे चोरीचे मोबाईल खरेदी केले असतील तर त्याने चोराशी कोठे संपर्क साधला? किती किमतीला चोरांकडून मोबाईल विकले जातात? याचा शोध घेण्याचा निर्णय लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसल खालिद यांनी घेतला.

आयुक्त खलिद यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, कल्याणचे पोलीस निरीक्षक अश्रुद्दिन शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, सायबर सेलचे अधिकारी असे एकूण सहा अधिकारी २४ हवालदारांचे पथक तांत्रिक माहितीच्या आधारे दोन महिने चोरीच्या मोबाईलवर काम करत होते. या कामासाठी मुंबई, ठाणे, कल्याण विभागातील लोहमार्ग पोलिसांची सहा तपास पथके तयार केली होती.

ही पथके सायबर सेल अधिकरी यांच्या सूचना आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीच्या मोबाईलचा माग काढत होती. आव्हानात्मक काम होते. एका मोबाईलचा माग काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत होते. चोऱट्यांनी रेल्वे स्थानक हद्दीत प्रवाशांचे बहुतांशी मोबाईल उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल राज्यात विकले आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांना तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. तपास पथकांनी उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये चोरांनी विकलेले मोबाईल सामान्य रहिवासी, किरकोळ विक्रेते यांच्याकडून हस्तगत केले. चोरीच्या मोबाईलची चोरट्यांनी रहिवाशांना तीन ते चार हजार रूपयांना विक्री केली आहे, असे रहिवाशांकडून पोलिसांना माहिती मिळाली. या दोन्ही राज्यातील विविध भागातून पोलिसांनी एकूण ५२ चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. यामध्ये २५ हून अधिक महागडे मोबाईल आहेत.

मुंबई, ठाणे, बोरीवली, कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरायचे आणि अशा अनेक चोऱ्या केल्यानंतर परप्रांतामधील मूळ गावी पळून जायाचे. अशी चोरांची पद्धत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना कुर्ला रेल्वे स्थानकात केल्या आहेत. या स्थानकातील चोरीस गेलेले १७, ठाणे स्थानकातील १०, दादर, छ.शिवाजी महाराज टर्मिनस, वसई, बोरिवली स्थानकातील चार आणि कल्याण, कर्जत, वाशी स्थानकातून चोरलेले प्रत्येक एक मोबाईल तपास पथकाने जप्त केला आहे.

मोबाईल जप्त केल्यानंतर पोलिसांनी मोबाईल चोरांचा माग काढण्यास सुरूवात केली आहे. आरोपी उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील गावखेड्यांमधील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader