ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्याचा ताण रेल्वे वाहतूकीवर आला आहे. जिल्ह्यात ऐरोली-कळवा नवीन काॅरिडाॅर, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण आसनगाव चौथी मार्गिका यांसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा झाल्या. परंतु भूसंपादन तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे अद्यापही हे प्रकल्प रखडलेले असल्याचे दिसत आहे. ऐरोली कळवा उन्नत मार्गिकेचे काम अद्याप ४५ टक्केच पूर्ण झाले आहे. तर कल्याण बदलापूर (तिसरी -चौथी मार्गिका) या प्रकल्पाचे काम जेमतेम २५ टक्के पूर्ण झाले आहे. कल्याण आसनगाव प्रकल्प अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. राज्याच्या आर्थिक पाहाणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता हे प्रकल्प पूर्ण होणार की नाही अशा चिंतेत प्रवासी आहेत.

गेल्याकाही वर्षांपासून मुंबई महानगर क्षेत्रातील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, बदलापूर आणि अंबरनाथ भागात वास्तव्यासाठी सर्वाधिक पसंती दिली जात आहे. येथील नोकरदारांना मुंबई शहरात आणि उपनगरात येण्यासाठी रेल्वे मार्गिकेला समांतर रस्ते उपलब्ध नसल्याने प्रवाशांचा भार उपनगरीय रेल्वेगाड्यांवर असतो. उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीचे वेळापत्रक गर्दीच्या वेळेत कोलमडल्यास महत्त्वाचे रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने तुडुंब भरतात. पावसाळ्यात प्रवाशांची अक्षरश: दैना होते.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मध्य आणि पश्चिम मार्गावर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (एमयुटीपी) टप्पा तीन आणि तीन अ मध्ये विविध प्रकल्प साकारले जात आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ऐरोली कळवा उन्नत मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी- चौथी मार्गिका, कल्याण -आसनगाव चौथी मार्गिका तसेच पनवेल येथील पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय काॅरिडाॅर या प्रकल्पांचा सामावेश आहे. या प्रकल्पांची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांमध्ये आनंद होता. निदान २०२५ मध्ये आपला प्रवास सुस्थितीत होईल असे येथून प्रवास करणाऱ्यांना वाटत होते. परंतु भूसंपादन आणि विविध तांत्रिक कारणांमुळे ही प्रकल्पे अद्यापही रखडलेलीच आहेत. कर्जत पनवेल प्रकल्प वगळता इतर प्रकल्प अद्याप ५० टक्के देखील पूर्ण झालेली नाही. त्याचा परिणाम आता प्रवाशांना भोगावा लागत आहे.

प्रकल्पांची स्थिती

– ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका

– या प्रकल्पास डिसेंबर २०१६ मध्ये एमयुटीपी तीन अंतर्गत मंजूरी मिळाली होती. २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प केला जात आहे. यातील पहिला टप्पा ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांमध्ये दिघा रेल्वे स्थानक तयार करणे आणि दुसऱ्या टप्प्यात ऐरोली-कळवा उन्नत मार्गिका तयार करणे होते. यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २.६५ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. यापैकी ०.५७ हेक्टर खासगी मालकीची आणि २.०८ हेक्टर सरकारी मालकीची आहे. येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती आहे. परंतु येथील रहिवाशांचा येथून हटण्यास विरोध असल्याने हा प्रकल्प रखडलेला आहे.- पनवेल-कर्जत नवी उन्नत मार्गिका- या प्रकल्पास जानेवारी २०१८ मध्ये मंजूरी मिळाली होती. या प्रकल्पाच्या कामास मात्र वेग आला आहे. हा प्रकल्प ६८ टक्के पूर्ण झाला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याची मुदत प्रकल्पाला आहे.

– कल्याण- बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका

– कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान १४.५ किमीच्या दोन मार्गिका असतील. यासाठी सुमारे १ हजार ५१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत ही महत्त्वाची आणि वर्दळीची स्थानके आहेत. तिसरी – चौथी मार्गिका झाल्यास येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

– कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका

– या प्रकल्पाच्या मार्गिकेची लांबी ३२.२२ किमी आहे. यासाठी १ हजार ७५९ कोटी इतका खर्च येणार आहे. या प्रकल्पात १३३.६१ कोटी रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्प केवळ ४ टक्के पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची मुदत डिसेंबर २०२५ आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या वाढत आहे. रेल्वे वाहतुकीवर ताण वाढला आहे. रेल्वेगाड्यांमधून पडून नागरिकांचा जीव जात आहे. परंतु लोकप्रतिनिधी काय करत आहेत हा प्रश्न आहे. या प्रकल्पांसाठी सरकारने निधी द्यायला हवा. परंतु निधी इतर योजनांवर खर्च होत आहे. सरकारने या प्रकल्पात लक्ष घालून ही प्रकल्प पूर्ण करायला हवीत. – लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

Story img Loader