कल्याण पूर्व भागातील सिध्दार्थनगर मधील रेल्वे सुरक्षा बळाच्या कर्मचारी निवास वसाहतीमध्ये बुधवारी रात्री रेल्वे सुरक्षा बळातील एका पोलीस उपनिरीक्षकाची याच विभागातील एका हवालदाराने लाकडी दांडक्याचे प्रहार करुन निर्घृण हत्या केली. हवालदाराची वेतनवाढ रोखल्याच्या वादातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता तपासी पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली.बसवराज गर्ग (५६) असे हत्या झालेल्या रेल्वे सुरक्षा बळाच्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते बळाच्या अंबरनाथ रेल्वे स्थानक विभागात कार्यरत होते. पंकज यादव (३५) असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वे सुरक्षा बळाच्या रोहा विभागात कार्यरत आहे. कोळसेवाडी पोलिसांनी त्याला रात्रीच अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, बसवराज गर्ग बुधवारी रात्री दहा वाजता आपल्या रेल्वे निवासातील घरातील खोलीत बिछान्यावर पडून मोबाईल मधील गाणी ऐकत होते. त्यांचा एक सहकारी उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी हे घराच्या बाहेर येऊन धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होते. त्रिपाठी यांना दूरवरुन अंधारातून एक इसम आपल्या खोलीत गेला असल्याचे जाणवले. धुलाई यंत्र सुरू असल्याने मोठा आवाज परिसरात सुरू होता. खोलीतून ओरडल्याचा आवाज आल्याने उपनिरीक्षक त्रिपाठी हातचे काम टाकून पळत खोलीत गेले. त्यांना उपनिरीक्षक बसवराज गर्ग पलंगावरुन खाली पडल्याचे दिसले. एक इसम पलंगाला मच्छरदाणीसाठी लावलेली लोखंडी सळई काढत होता.
हेही वाचा >>>विश्लेषण: संजय केळकर ठाणे भाजपमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक आहेत का?
‘काय झाले’ म्हणून त्रिपाठी यांनी त्या अज्ञात इसमाला विचारताच त्याने ‘तू मध्ये पडू नकोस’ असा इशारा दिला. पलंगाच्या बाजुला उशी, चादर, लाकडी दांडके पडले होते. हा प्रकार पाहताच त्रिपाठी यांनी बाहेर येऊन आपल्या सहा सहकाऱ्यांना ओरडून आवाज दिला. त्यावेळी एस. एस. शेटे, संतोष पटेल, मंगेश उमाशंकर कुर्मी हे तेथे धावत आले. तोपर्यंत धट्टाकट्टा अज्ञात इसम तेथून पळून गेला. मारेकऱ्याला पळून जाताना इतर सहकाऱ्यांनी पाहिले. उपनिरीक्षक त्रिपाठी यांनी पळून गेलेला इसम कोण अशी विचारणा सहकाऱ्यांना केली. त्यांनी तो रेल्वे सुरक्षा बळातील हवालदार पंकज यादव आहे असे सांगितले. बसवराज यांच्या अंगावर मारहाणीचे ओरखडे होते. त्रिपाठी यांच्यासह सहकाऱ्यांनी बसवराज यांना तात्काळ रेल्वे रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपनिरीक्षक त्रिपाठी यांच्या तक्रारीवरुन कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे, असे साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी सांगितले.