ठाणे, कल्याणमधील प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

रेल्वेस्थानकांमधील तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या जनसाधारण तिकीट केंद्रांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानक आवार तसेच परिसरातील दुकानांत किरकोळ वाढीव कमिशन देऊन प्रवाशांना आरामात तिकीट मिळवता येत असल्याने या केंद्रांकडे अधिकाधिक प्रवासी वळू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे, कल्याण व डोंबिवलीसारख्या गर्दीच्या स्थानकांमधील जनसाधारण तिकीट केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

गर्दीच्या वेळेत प्रवाशांच्या रांगांमुळे तिकीट खिडक्यांवर होणारी तुडुंब गर्दी आणि प्रवाशांचे हाल पाहता साधारण १० वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनातर्फे स्थानक परिसरात जनसाधारण तिकीट नोंदणी यंत्रणा (जेटीबीएस) केंद्रे सुरू करण्यात आली. या तिकीट केंद्रांवरून तिकीट काढल्यास प्रवाशांना एकल प्रवासासाठी साधारण तिकीट किमतीपेक्षा एक रुपया, तर परतीच्या प्रवासासाठी दोन रुपये अधिक मोजावे लागतात. ही योजना तशी जुनी असली तरी सुरुवातीच्या काळात त्यास फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. मूळ तिकिटापेक्षा अधिक दर मोजावे लागत असल्याने प्रवासी या तिकीट केंद्रांकडे फारसे फिरकत नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात तिकिट खिडक्यांवरील रांगांमध्ये ताटकळत राहण्यापेक्षा थोडय़ा जास्त दराने ‘जेटीबीएस’ केंद्रांवरून तिकीट घेण्याकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मोजक्या औपचारिकता पूर्ण करून रेल्वे प्रशासनाची मान्यताप्राप्त असलेले तिकीट घर सहज सुरू करता येते. रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या ज्यूस सेंटर, चहाचे दुकान, मोबाइल दुरुस्तीचे दुकान अशा दुकानांमध्ये ही तिकीट केंद्रे सुरू असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून येता-जाता सहजपणे तिकीट काढता येते. काही काळापर्यंत काही मोजक्याच ठिकाणी उपलब्ध होत असलेल्या या तिकीट केंद्रांची संख्या आता कमालीने वाढली आहे. रेल्वेच्या काही मोजक्या तिकीट खिडक्या आणि नवनवीन तिकीट यंत्रणांवर वाढत चाललेला प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी जेटीबीएस तिकीट खिडक्यांनी चांगलाच हातभार लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक या तिकीट खिडक्यांमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर झालाच, परंतु एक प्रकारे रोजगारही उपलब्ध झाला. अशा स्वायत्त तिकीट विक्री केंद्रांमुळे प्रवासी आणि विक्रेता दोघांचाही फायदा होत आहे.

नंदकुमार देशमुख, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक, ठाणे