ठाणे: रेल्वे रूळ ओलांडतांना होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन तसेच पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी ठाणे आणि लगतच्या स्थानक परिसरात प्रवाशांकडून रुळ ओलांडण्याचे प्रकार सुरुच असल्याचे चित्र आहे. ठाणे रेल्वे पोलिसांनी गेल्या ११ महिन्यात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या १ हजार १०७ प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच अपंगाच्या डब्यातून बेकायदेशीररित्या प्रवास करणाऱ्या २ हजार ६५६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे स्थानकातून दररोज पाच ते सहा लाख प्रवासी प्रवास करतात. स्थानकात प्रवासी सेवेसाठी एकूण पाच पादचारी पूल आहेत. सकाळी आणि संध्याकाळी या पूलांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. याच गर्दीपासून टाळण्यासाठी अनेकजण रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटांवर जात असतात.
हेही वाचा… ठाण्यात विहीरीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेळेवेळी प्रयत्न केले जातात. तरी देखील अनेक प्रवासी रूळ ओलांडून प्रवास करतात. या प्रवाशांवर ठाणे रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली आहे. १ जानेवारी ते २८ नोव्हेंबर या कालावधीत १ हजार १०७ प्रवाशांवर रूळ ओलांडत असल्याने कारवाई करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.
अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
रेल्वे गाड्यांमध्ये अपंगासाठी विशेष डबा असतो. अनेकदा या डब्यांमधून सामान्य प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करतात. जानेवारीपासून नोव्हेंबर अखेरीपर्यंत अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या २ हजार ६५६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.