ठाणे : ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान, धिम्या मार्गिकेवर सोमवारी सायंकाळी ओव्हरहेड तारेचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे धिम्या मार्गिकेची वाहतूक जलद मार्गिकेवर वळविण्यात आली. त्याचा परिणाम मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेवर झाला.
सुमारे पाऊण तास रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या. सर्व रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळी सिग्नल यंत्रणेचा बिघाड आणि सायंकाळी पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी रस्ते मार्गे वाहतूक करण्याचा निर्णय घेतला. परंतु रस्त्यावरही मोठ्याप्रमाणात कोंडी झाली होती.
हेही वाचा – डोंबिवलीतील उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा मुसळधार पावसामुळे रद्द
ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान कोपरी रेल्वे पूलाजवळ सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास धिम्या मार्गिकेवरील ओव्हरहेड तारेचे खांब कोसळले. त्यामुळे धिम्या मार्गिकेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेवर झाला. सायंकाळी ६ नंतरही येथील बिघाड दुरुस्त झाला नव्हता. मध्य रेल्वे प्रशासनाने धिम्या मार्गिकेवरील सर्व रेल्वेगाड्यांची वाहतूक जलद मार्गावरून सुरू केली होती. त्यामुळे धिम्या आणि जलद मार्गिकेच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक सुमारे पाऊण तास उशिराने सुरू होती. रेल्वेगाड्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाणे आणि त्या पल्ल्याडील सर्वच स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली होती.
हेही वाचा – बदलापुरात वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस, वाऱ्याचा वेगही ताशी १०० किलोमीटरवर
पाऊस पडल्याने अनेकांनी कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने सर्वच गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. त्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. महिला वर्गाची सर्वाधिक कुचंबणा होत होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने काहीजणांनी रस्ते मार्गे प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मुख्य महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांंवरही कोंडी झाली होती. रस्ते आणि रेल्वे मार्ग ठप्प झाले होते.