ठाणे : बदलापूर येथे उत्स्फूर्तपणे झालेल्या आंदोलनाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर बसला. कर्जत, खोपोली, बदलापूरहून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाड्या ठाणे, मुंबईच्या दिशेने येऊ शकल्या नाही. त्यामुळे सकाळी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी अशी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू ठेवली होती. परंतु रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने इतर स्थानकांवर गर्दी झाली होती. बदलापूर पल्ल्याड राहणाऱ्या नागरिकांना घरातून काम करण्याची वेळ आली. तर अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागला. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक पनवेल मार्गे वळविली होती.

बदलापूर येथील शाळेमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाला होता. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करत रेल्वे स्थानकात रेल रोको केला. या घटनेमुळे वांगणी ते कर्जत, खोपोली या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सकाळी आंदोलन तीव्र झाल्याने बदलापूर पल्ल्याडील नागरिकांनी घरातून काम करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक सुरू ठेवली होती. तर कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची वाहतुक पनवेल मार्ग वळविण्यात आली. दुपारनंतरही हा रेल रोको कायम होता. त्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.