डोंबिवली – डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थानक प्रबंधक, लोहमार्ग पोलीस ठाणे आणि तिकीट आरक्षण केंद्र कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित करण्याची कार्यवाही रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. या नवीन कार्यालयांसाठी डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकाजवळ डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या जागेत नवीन बांधकामाचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील इमारतीत रेल्वेचे स्थानक प्रबंधक, उपप्रबंधक, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे, तिकीट खिडक्या आणि त्याच्या पुढील जागेत कल्याण दिशेने तिकीट आरक्षण केंद्र आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती प्रवासी संंख्या विचारात घेऊन ही कार्यालये फलाटाजवळ असल्याने प्रवासी गर्दीला अडथळा होऊ लागली आहेत. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील लोहमार्ग पोलीस ठाणे, स्थानक प्रबंधक कार्यालय, तिकीट आरक्षण केंद्र नवीन जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानकावरील या कार्यालयांचे नवीन जागेत स्थलांतर करावयाचे असल्याने डोंबिवली पश्चिमेत डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वेच्या जागेत रेल्वे प्रशासनाने स्थलांतरित कार्यालयांच्या उभारणीसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरील तिन्ही कार्यालयांचे स्थलांतर झाल्यानंतर फलाट क्रमांक एकवर प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात नवीन जागेतील बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच दरम्यान एक पादचारी पूल उभारणीचे काम रेल्वेकडून सुरू आहे. याशिवाय कोपर बाजुला डोंबिवली रेल्वे स्थानकात आणखी एका पादचारी पुलाची येत्या काळात रेल्वेकडून उभारणी करण्यात येणार आहे. या प्रस्तावित पुलाचा आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकातील भविष्यातील प्रवासी गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासन या सुविधा या स्थानकात उपलब्ध करून देत असल्याचे समजते.

वाहनतळ सुरू करादरम्यान, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील वाहनतळ रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने नोकरदारांची गैरसोय होत आहे. हे वाहनतळ सुरू करावे म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी स्थानक प्रबंधक एच. पी. मीना यांची भेट घेतली. वाहनतळ सुरू करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी विभाग प्रमुख शाम चौगले, राजेंद्र सावंत, शेखर चव्हाण, प्रकाश कदम, मंदार निकम, अनिल मुथा, प्रिया दांडगे, सायली जगताप, ऋतनिल पावसकर, साक्षी भांडे उपस्थित होते. दहा दिवसात हे वाहनतळ सुरू करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली.