ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली. पहाटेपासूनच सीएटीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही दिशांची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. ठाणे ते कल्याणदरम्यानची वाहतूक सुरू असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जात असला तरी सुमारे एक ते दोन तासांच्या अंतराने एखादी लोकल या भागातून जात होती. लांब पल्ल्याच्या गाडय़ांचाही प्रचंड खोळंबा झाला होता. ठाण्यापासून कल्याणपर्यंत जागोजागी मेल एक्स्प्रेस गाडय़ा एकामागोमाग एक अडकून पडल्या होत्या. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दुपारी उशिरापर्यंत ही परिस्थिती कायम होती. पाणी पूर्णपणे ओसरल्याशिवाय रेल्वे वाहतूक सुरळीत होऊ शकणार नाही, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी घरीच जाणे पसंत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा