कल्याण – कल्याण-डोंबिवली परिसरात गुरुवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजतादरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गर्जनेसह पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने भाजीपाला, हरभरा लागवड शेतकऱ्यांची सकाळीच पळापळ झाली.
मागील दोन दिवसांपासून क्षितिजावर काळे ढग आहेत. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी परिस्थिती आहे. बुधवारी संध्याकाळी अशीच परिस्थिती होती. गुरुवारी सकाळी कल्याण, डोंबिवली परिसरात सकाळी आठ वाजता ढगांच्या गडगडाटासह पावसाने वीस मिनिटे हजेरी लावली. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पावसाने गोंधळून टाकले. पाऊस सुरू झाला आहे तर छत्री न्यावी की नाही, अशा संभ्रमात नोकरदार होते. बहुतांशी नोकरदारांनी पावसाचा आनंद घेत रिक्षा पकडणे पसंत केले. काहींनी पायी जात पावसाचा शिडकावा अंगावर घेत सकाळीच पावसाचा आनंद लुटला. पहाटेपासून विविध भागांत सकाळच्या वेळेत फिरणारे नागरिक अचानक आलेल्या पावसाने सुखावले होते.
हेही वाचा – ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलाजवळ रेड्याचा अपघातात मृत्यू
शहरी भागात नागरिक पावसाचा आनंद लुटत असताना, ग्रामीण भागात हरभरा, मोहरी, धणे उत्पादक शेतकरी, भेंडी, गवार, काकडी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. बहुतांशी शेतकऱ्यांनी हरभरा काढून घर परिसरात उन्हात वाळत ठेवला आहे. आठवडाभर हरभरा उन्हात वाळविल्यानंतर शेतकरी तो कुटण्यास घेतो. हरभऱ्याचा दाणा रोपापासून अलग करतो. हरभरा पावसात भिजला तर त्याला कीड लागण्याची भिती असते. त्यामुळे वाळत ठेवलेला हरभरा घरात किंवा ओडाशाला ठेवण्याची धावपळ पावसामुळे शेतकऱ्यांना करावी लागली, अशी माहिती कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील शेतकरी चंद्रकांत भोईर यांनी दिली.
हेही वाचा – कल्याणमध्ये टेम्पो अंगावरून गेल्याने पाळीव श्वानाचा मृत्यू
शहापूर, कल्याण, मुरबाड तालुक्यात भेंडी लागवडीचा हंगाम सुरू आहे. या भागातील भेंडी परदेशात विक्रीसाठी जाते. या भेंडीवर पाऊस पडला तर भेंडीला कीड लागते. ती खराब होऊन व्यापारी ती खरेदीसाठी नाकरतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तयार भेंडी गळून पडते. अशीच परिस्थिती टोमॅटो, गवार, काकडी पिकाची आहे, असे शहापूर तालुक्यातील चरीव येथील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत पानसरे यांनी सांगितले. ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहोर, आंब्याची लहान लगडलेली फळे गळू लागल्याने ठाणे जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.