ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शनिवारी दिवसभर कायम होता. जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पडलेले खड्डे आणि त्यातच पावसाचे साचलेले पाणी यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी झाली. त्यात शनिवार, रविवार सुट्टीनिमित्ताने सहलीसाठी निघालेल्या नागरिकांची वाहने रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडली. मुंबई-नाशिक तसेच घोडबंदर मार्गावर संथगतीने वाहतूक सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. ठाणे शहरात शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस झाला. काही वेळानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सायंकाळपर्यंत शहरात पावसाची संततधार सुरू होती. असेच काहीसे चित्र ठाणे पल्ल्याडच्या भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण भागात होते. ठाणे शहरात अनेक सखल भागात मुसळधार पावसामुळे काहीकाळ पाणी साचले होते. पण, पावसाचा जोर कमी होताच सखल भागात साचलेले पाणी ओसरले. घोडबंदर मार्गावर पावसामुळे खड्डे पडले असून यामुळे आधीच वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यातच शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे घोडबंदर मार्गावरील उड्डाण पुलाच्या पायथ्याशी, कापुरबावडी नाका, माजिवडा या भागात स्कुटरचे चाक अर्धे बुडेल इतके पाणी साचले होते. तर, भिवंडी शहरातही काही ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे या भागात काही काळ वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी झाली होती. घोडबंदर मार्गावरील आनंदनगर ते भाईंदरपाडा येथे तर, मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव ते रांजनोली नाका आणि शहापूर येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून त्यात कुणीही जखमी झालेले नाही.

हेही वाचा – महिलेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या, तीन आरोपींना अटक

कल्याण डोंबिवली शहर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. संततधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. बाजारपेठांमधील वर्दळ घटली आहे. पावसाच्या माऱ्याने कल्याण पश्चिम येथील जोशी बागेतील रुबाब बानू या एक माळ्याच्या अतिधोकादायक इमारतीची भिंत शनिवारी सकाळी कोसळली. इमारतीत कुणीही राहत नसल्यामुळे दुर्घटना टळली. पालिका अधिकाऱ्यांनी ही इमारत दिवसभरात जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केली. पावसाळी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. पावसामुळे उल्हास, काळू, भातसा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

हेही वाचा – उत्तरप्रदेशातून ठाण्यात नातेवाईकाकडे येऊन दागिने चोरायचे, ठाणे पोलिसांनी केली दोघांना अटक

शनिवार सकाळपासूनच अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू होता. अचानक मध्येच एखादी मोठी सर येत होती. तर काही मिनिटांसाठी पाऊसही विश्रांती घेत होता. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत होती. शहरांसोबतच कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग, मुरबाड तालुक्यातही पावसाची संततधार सुरूच होती. बारवी धरणक्षेत्रातही चांगला पाऊस शनिवारी पडत होता. तर रायगड जिल्ह्यातील माथेरान, कर्जत भागात चांगला पाऊस होत असल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ पहायला मिळाली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain increased in thane district traffic slowed down due to potholes and waterlogging ssb