मुसळधार पावसाने शुक्रवारी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, परिसराला अक्षरश: झोडपून काढले. कल्याण शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते, तर काही भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. शहरातील नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने रस्ते पाण्यात वाहून गेले.
त्यामुळे वाहतुकीचा बोऱ्या वाजला. नालेसफाई शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाला पहिल्याचा पावसाने मोठा झटका दिला.
काही परिसरांत पूरस्थिती
मुसळधार पावसाने कल्याण, डोंबिवली शहरातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुरबाड रस्ता, पत्रीपूल-दुर्गाडी रस्ता, संतोषी माता, खडकपाडा भागातील रस्त्यांवर काही ठिकाणी गटाराचे पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने काही भागांत रिक्षावाल्यांनी रिक्षा बंद ठेवल्या होत्या. पावसाचा जोर वाढल्याने सकाळ, दुपारच्या पालिकेच्या, खासगी शाळा सोडून देण्यात आल्या होत्या. पालिकेची आपत्कालीन, अग्निशमन यंत्रणा गुरुवार रात्रीपासून शहराच्या विविध भागांत कोसळलेली झाडे तोडणे, तुंबलेले पाणी मोकळे करण्याची कामे करीत आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेतीबंदर परिसर संवेदनशील
मुसळधार पाऊस सुरू झाला की कल्याणमधील खाडीकिनारी असलेला रेतीबंदर बाजारपेठ विभाग अतिशय संवेदनशील बनतो. रात्रीपासून सुरू असलेला पाऊस, समुद्राला दुपारी येणारी महाभरती यामुळे रेतीबंदर बाजारपेठ भागात काही तास पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज असल्याने स्थानिक रहिवाशांनी स्थलांतराची तयारी ठेवली आहे. गेल्या वर्षीही दोन दिवस समुद्राला उधाण असल्याने खाडीचे पाणी कल्याणमधील बाजारपेठ, रेतीबंदर, वालधुनी भागांत घुसले होते. या भागातील जहाज बांधणी व्यवसाय या काळात बंद ठेवण्यात येतात, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
८० मिमी पावसाची नोंदी
कल्याण तालुक्यात सकाळपर्यंत ८० मिलिमीटर पाऊस पडला आहे. तालुक्यात कोठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली नाही. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. गावोगावचे तलाठी, मंडल अधिकारी स्थानिक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण विभागाने पाणी तुंबल्याचे प्रकार कोठे घडले नाहीत, मात्र झाड पडल्याच्या, फांद्या तुटल्याचे प्रकार पालिका हद्दीत काल रात्रीपासून घडले आहेत असे सांगितले.
वालधुनी, नेतिवलीतील
झोपडीधारकांना धोका
मुसळधार पावसामुळे कल्याण, डोंबिवलीतील काही परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. उल्हास नदी खोरे, श्रीमलंग डोंगरातून पावसाचे पाणी कल्याण परिसरात वालधुनी, उल्हास नदीतून येते. त्यामुळे या नदीकिनारी पूरपरिस्थिती निर्माण होते. उल्हासनगर, कल्याणमधून वाहत असलेल्या वालधुनी नदीकिनारी अनेक झोपडीधारकांनी नदी पात्रात झोपडय़ा बांधल्या आहेत. या झोपडय़ांची जोती दुतर्फा वाहत असलेल्या पाण्यामुळे पाण्याखाली गेली आहेत. या झोपडय़ांमधील रहिवाशांनी रेल्वे स्थानके, उड्डाण पुलाखाली आसरा घेतला आहे. डोंगरांचे कोपरे खणून नेतिवली टेकडी भागात झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. पावसामुळे डोंगर भुसभुसीत होऊन दरडी कोसळण्याची भीती असल्याने या भागातील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. जरीमरी नाला, खडेगोळवली, काटेमानिवली शहरातील इतर नाले भरभरून वाहत आहेत. टिटवाळा, मांडा भागांत कोणतेही नियोजन न करता बेकायदा चाळी, इमारती बांधण्यात आल्या आहेत. सरकारी, वन जमिनीवर माळरानावर, शेतात ही बांधकामे करण्यात आल्याने या बांधकामांच्या चोहोबाजूने पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशांना घरात अडकून पडावे लागले आहे.