दरवर्षी पावसाळ्यात ९० लाख लिटर पाण्याचा संचय; टँकरच्या जाचातून कायमची सुटका
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध असणारे जलस्रोत आधीच अपुरे आहेत. अशा परिस्थितीत ‘पावसाचे पाणी जिरवा आणि वापरा’ ही पर्यायी जलनीतीच भविष्यात उपयोगी ठरणार आहे. घोडबंदर परिसरात वसलेल्या नव्या ठाण्यातील ‘सिद्धांचल-फेज ३’ या गृहसंकुलाने इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संधारित करून योग्य जलधोरण अवलंबले तर शहराला नव्या धरणाची आवश्यकता लागणार नाही, हे दाखवून दिले आहे. या संकुलात नऊ इमारती असून पावसाळ्यात छतावर पडणारे ९० लाख लिटर पाणी साठविण्यात या सोसायटीला यश आले आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या ‘सिद्धांचल फेज -३’ या गृहसंकुलातील २५२ सदनिकांना होणारा पाणीपुरवठा गरजेच्या मानाने अपुरा होता. त्यामुळे पाण्याची गरज भागवण्यासाठी सोसायटीने सुरुवातील टँकरची मदत घेतली. यासाठी सोसायटीला दरमहा एक ते सव्वा लाख रुपये खर्च येत होता. मात्र याच सोसायटीत राहणारे ‘रोटरी क्लब ऑफ प्रीमियम’चे समीर शिंदे यांनी पर्जन्यजलसंधारण करण्याचा पर्याय सुचविला. रोटरी समूहातर्फे याविषयी जनजागृती आणि मार्गदर्शन करणारे हेमंत जगताप यांच्या देखरेखीखाली संकुलातील सर्व इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करण्यात आले. त्यासाठी सोसायटीला पावणे तीन लाख रुपये खर्च आला. २०१२ मध्ये सोसायटीने ही योजना राबवली. मात्र त्यामुळे सोसायटी टँकरमुक्त झाली.
टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सोसायटीला वर्षभरात साडेतीन ते चार लाख खर्च येत होता. जलसंधारणामुळे तो खर्च वाचला. संकुलात चार कूपनलिका आहेत. त्यांद्वारे १५ जूनपर्यंत सोसायटीला वर्षभरात किमान ९० लाख लिटर्स पाणी मिळते. ते पाणी संकुल परिसरातील झाडे, बाग तसेच घरात पिण्याव्यतिरिक्त इतर कामांना वापरले जाते. जलसंधारण योजना राबविल्यामुळे सिद्धांचल-फेज-३ च्या नऊ इमारतींपैकी तीन इमारतींना महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात सवलत दिली आहे.
सध्या जलसंधारणातून उपलब्ध झालेले पाणी इतर कामांसाठी वापरले जाते. मात्र प्रक्रिया करून ते पिण्यासाठी वापरणेही शक्य आहे. त्यासाठी सहा ते सात लाख रुपये खर्च आहे. सोसायटी त्या दृष्टीने विचार करीत आहे.
शशिकांत नांदुर्डीकर, अध्यक्ष, सिद्धांचल-फेज, घोडबंदर रोड
पर्जन्यजलसंधारण योजना राबवून शहरातील नागरिक पाण्याच्या बाबतीत काही प्रमाणात स्वयंपूर्ण होऊ शकतात. गृहसंकुलांना प्रकल्प व्यवहार्यता अहवाल तसेच तांत्रिक सल्ला आम्ही रोटरीच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध करून देतो.
– हेमंत जगताप, जलतज्ज्ञ, रोटरी समूह